पुणे :  गोळीबार, कोयता गँगचा हल्ला या गोष्टी आता पुण्यासाठी नवीन नाहीत. रविवारी  पुण्यातील नानापेठेत माजी नगरसेवकाची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. मात्र या हत्येला किनार आहे ती बहीण भावांच्या नात्यापेक्षा वरचढ ठरलेल्या संपत्तीच्या हव्यासाची.. या हत्येनंतर पहिल्यांदाच आंदेकर टोळीचे प्रमुख  आणि मृत वनराज आंदेकरांच्या (Vanraj Andekar)   वडिलांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.  आम्ही गुन्हेगार होतो तर आम्हाला मारायचं होतं,  माझ्या निरपराध मुलाला का मारलं? असा सवाल बंडू आंदेकरांनी  केला आहे.


वनराज  आंदेकर यांच्या हत्येनंतर टोळीयुद्ध भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे, यावर बोलताना बंडू आंदेकर यांनी म्हटलं आहे की, मी शपथ घेऊन सांगतो असं काही करणार नाही. मी आता न्यायाची वाट बघेल. पण आम्ही गुन्हेगार होतो   तर आम्हाला मारायचं होतं, निरपराध मुलाला का मारलं?


वनराजची काही चूक नव्हती : बंडू आंदेकर 


बंडू आंदेकर म्हणाले, वनराज नाही तर मी टार्गेट होतो.  त्यांना आम्हाला मारायचं होतं पण वनराजची हत्या झाली, वनराजची काही चूक नव्हती. मी गुन्हेगारी सोडून आता अनेक वर्षे झाली आहे. आमच्या घरात आता कोणीच  गुन्हेगार नाहीत. दोन भाऊ , बहीण बायको मुलगा नगरसेवक झालेत पण आमचा दरारा बघवत नाही म्हणून असं करण्यात आले आहे.  आम्ही कोणाचे  काही बिघडवलं नाही  तरी आम्हाला अडकवतात.


ज्याला मीच मोठा केला आणि आज तोच माझ्यावर उलटला: बंडू आंदेकर


सोमनाथ गायकवाडला मीच मोठा केला आणि आज तोच माझ्यावर उलटला, आणि माझ्याच मुलाची  वनराजची हत्या केली. मला  न्यायाची अपेक्षा आहे, आता मी बदला वैगेरे घेणार नाही. मी काही केलं तर आता  कुटुंब उघडं पडेल असंही यावेळी बंडू आंदेकर यांनी म्हटलं आहे.


हत्येमागचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड


पुणे शहरात गेल्या दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा नियोजनबद्ध पध्दतीने कट रचून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. आंदेकर यांची हत्या कौटुंबिक, संपत्ती, तसेच वर्चस्वाच्या वादातून झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, त्यादृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे. या प्रकरणी 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर या हत्येमागचा मुख्य सूत्रधार सोमनाथ गायकवाड (Somnath Gaikwad) असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.  


हे ही वाचा :


 आंदेकर टोळीतून फुटलेला सोमनाथ गायकवाड वनराज आंदेकर खून प्रकरणाचा मुख्य सूत्रधार? नाना पेठेत वर्षभरापूर्वी झालेल्या हल्ल्याचं कनेक्शन