मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election 2024) सगळीकडे धामधूम आहे. सध्या ते वंचितच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. याच निवडणुकीच्या काळात धकाधकीमुळे त्यांची तब्येती खराब झाली आहे. 14 एप्रिलनंतरे ते पुन्हा एकदा सक्रिय होणार आहेत. 


सुजात आंबेडकर यांच्याकडून उमेदवारांचा जोमात प्रचार


 गेल्या काही दिवसांपासून राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. राज्यातील प्रत्येक पक्ष आणि त्या-त्या पक्षाचे उमेदवार जोमात प्रचार करत आहेत. सुजात आंबेडकर हेदेखील गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना भेटी देऊन वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. निवडणुकीच्या धकाधकीमुळे त्यांची प्रकृती बिघडली आहे. म्हणूनच सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. येत्या 14 एप्रिलपासून ते पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार असून उमेदवारांच्या प्रचाराचे काम करणार आहेत.  


सुजात आंबेडकर यांच्याकडून कार्यकर्त्यांना संदेश


दोन दिवसांपासून माझी तब्येत बरी नसून रुग्णालयात आहे. पण काळजी करण्यासारखं काहीही नाहीये. मला डॉक्टरांनी दोन दिवस विश्रांती करण्यास सांगितलं आहे. मात्र कार्यकर्त्यांनी काम थांबवू नये. ज्या पद्धतीने काम चालू आहे, त्याच पद्धतीने काम पुढे जायला हवे. मला तीन ते चार दिवस आराम करायला सांगितलेला असला तरी मी येत्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापासून म्हणजेच 14 एप्रिलपासून पुन्हा एकदा जोमात कामाला लागणार आहे. आपण सर्वांनी प्रचारात मागे हटू नये. जिंकत आलेल्या या निवडणुकीत आता पराभूत व्हायचं नाहीये. म्हणूनच सर्वांनी जिद्दीने कामाला लागावे, अशी विनंती करतो.


दरम्यान, वंचित बहुजन आघाडी या लोकसभा निवडणुकीत एकट्यानेच निवडणूक लढवत आहे. या पक्षाने राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघासाठी आपले उमेदवार दिले आहेत. या उमेदवारांच्या विजयासाठी वंचितकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मविआने वंचितला पाच जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी तो फेटाळला. त्यामुळेच वंचित आणि मविआ यांच्यात युती होऊ शकली नाही. आता काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (पवार गट) हे महाविकास आघाडीच्या रुपात एकत्र निवडणूक लढवत आहेत.


हेही वाचा : 


मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडली; पद आणि सदस्यात्वाचा राजीनामा, माढ्यात घडामोडींना वेग