यूपीएससीचे यशवंत : कसगीचा गिरीश बदोले राज्यात अव्वल
एबीपी माझा वेब टीम | 27 Apr 2018 09:54 PM (IST)
उस्मानाबादच्या गिरीश बदोले याने यूपीएससी परीक्षेत देशात 20 वा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे.
उस्मानाबाद : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात सलग दुसर्या वर्षी उस्मानाबादचा झेंडा कायम राहिला आहे. दोन एकर शेतीवर चरितार्थ चालवणार्या दिलीप बदोले यांचा मुलगा गिरीश बदोले याने यूपीएससी परीक्षेत देशात 20 वा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. गेल्या वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील विश्वांजली गायकवाड हिने देशात अकरावे स्थान पटकावत राज्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला होता. उमरगा तालुक्यातील कसगी या छोट्याशा गावातून गिरीश बदोले याने संपादित केलेलं घवघवीत यश ग्रामीण भागातील अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. इयत्ता पहिली आणि दुसरी दोन वर्ष गावातच त्याने शिक्षण घेतलं. त्यानंतर निलंगा तालुक्यातील कासारशिर्शी येथे आजोळी राहून चौथीपर्यंतचं शिक्षण त्याने पूर्ण केलं.