अकोला :  कोरोनामुळे जगण्यासाठी संघर्ष तरीत असलेल्या एका तरूणाला वाचविण्यासाठी अख्खं जग धावून आलं आहे. हा तरूण आहेय अकोला जिल्ह्यातील तेल्हाराचा. देवानंद सुरेश तेलगोटे असं या तरूणाचं नाव आहेय. त्यानं मुंबईतील पवईच्या आयआयटीमधून 'केमिकल इंजिनिअरींग'चं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याने काही महिन्यांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याची ऑगस्टमध्ये 11 तारखेला मुलाखत आहे. कोरोनामुळे देवानंदची फुफ्फुसं निकामी झाल्याने त्याच्यावर सध्या हैद्राबादच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंतच्या उपचारासाठी त्याला जगभरातून एक कोटींची मदत मिळाली आहे. मात्र, आता फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आणखी एक कोटींवर रूपयांची त्याला आवश्यकता आहे. त्याचे नातेवाईक आणि मित्रांनी त्याला वाचविण्यासाठी परत देश आणि जगाला मदतीची साद घातली आहे. देवानंदला वाचविण्यासाठी त्याच्या मित्रांनी समाज माध्यमांवर 'हेल्पिंग हँड्स फॉर देवा' या नावाने एक 'कँपेन' चालविलं आहे.


अतिशय होतकरू आणि हुशार देवानंदचा जगण्यासाठी संघर्ष : 


 देवानंद सुरेश तेलगोटे हा तरूण अकोला जिल्ह्यातील तेल्हारा शहरातला. त्याचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं. तर शालेय शिक्षण तेल्हारा शहरात. बारावी अतिशय चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला देवानंदची पुढील शिक्षणासाठी देश आणि जगभरातील नामवंत संस्था असलेल्या मुंबईतील पवईतल्या 'आयआयटी'मध्ये निवड झाली. त्याने पवईतून 'केमिकल इंजिनियरींग'चा अभ्यासक्रम पुर्ण केला आहे. पुढे त्याने  स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली गाठली. अतिशय होतकरू अन हुशार असलेल्या देवानंदने अलिकडेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आहे. देवानंदचे वडील सुरेश तेलगोटे हे सैन्यातून सेवानिवृत्त झालेत. ते कुटुबियांसह तेल्हारा येथे राहतात. 


दिल्लीत झाली होती कोरोनाची लागण : 
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मे महिन्यात अंतिम मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर झाले होते. 5 मेला देवानंदची मुलाखत असल्याने तो एप्रिलमध्येच तयारीसाठी दिल्लीला गेला होता. अन तिथेच त्याला कोरोनानं गाठलंय. तिथे तिथे योग्य उपचार मिळत नसल्याने तो अकोल्यात परत आला होता. अकोल्यात त्याच्यावर उपचारही सुरू झाले होते. मात्र, त्याची प्रकृती ढासळत गेली. अन यातच कोरोनामूळे त्याची फुफ्फुसं ऐंशी टक्के निकामी झाल्याची बाब वैद्यकीय अहवालात पुढे आली. त्याला पुढील उपचारासाठी हैद्राबादच्या के.आय.एम.एस. रूग्णालयात हलवायचं होतं. सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या त्याच्या वडिलांनी पोराच्या उपचारासाठी आयुष्याची पुंजी पणाला लावली. मात्र, या पैशात उपचार शक्य नव्हतेच. अन यातूनच समाज, संवेदना अन माणुसकीला मदतीची हाक देण्यात आली. अन् येथूनच जगभरात देवानंदसाठी सुरू झाला माणुसकीचा महायज्ञ. 


'हेल्पिंग हँड्स फॉर देवा' या चळवळीला जगभरातून मदत : 


या 'कँपेन'च्या मदतीला जगभरातील माणुसकी धावून आली. 'हेल्पिंग हँड्स फॉर देवा' या 'सोशल मीडिया'वरील  'कँपेन'ला जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला. यासाठी काम करणाऱ्या 'मिलाफ' या संस्थेच्यासोबतच हा मदतीचा ओघ सुरू झाला. जगभरात विखुरलेले आयआयटीएन्स, त्याच्यासोबत युपीएससीचा अभ्यास करणारे मित्र, अकोल्यातील मित्र आणि नातेवाईक यांच्या मदतीतून जवळपास एक कोटींचा निधी उभा झाला देवानंदसाठी जमा झाला होता. या सर्व कँपेन'ला आतापर्यंत राज्य, देश आणि जगभरातून दहा हजारांवर लोकांनी मदत केली आहे. 


'एअर अँब्युलंस'ने पुढील उपचारांसाठी हलविले हैद्राबादला : 
हा निधी जमा झाल्यानंतर त्याला 15 मेला पुढील उपचारांसाठी एयर अँब्युलंसने अकोल्यावरून हैद्राबादला हलविण्यात आलं. यासाठी सर्व सोपस्कार पुर्ण करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याची प्रकृती सुधारत होतीय. यातच त्याने 25 मेला रूग्णालयात आपल्या वाढदिवसही साजरा केला होताय. मात्र, चार दिवसांपुर्वी त्याची प्रकृती कमालीची नाजूक झालीये. डॉक्टरांनी यासाठी त्याच्यावर फुफ्फुसं प्रत्योरोपनाची शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचं मत दिलं आहे. 


फुफ्फुस प्रत्योरोपन शस्त्रक्रियेसाठी आणखी हवेत एक ते दीड कोटी : 
देवानंदच्या फुफ्फुस प्रत्योरोपन शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च हा एक कोटींच्या वर आहे. आता परत नव्यानं ही मदत उभी करण्यासाठी त्याचे मित्र सरसावले आहेत. कोरोनामूळे समोर ढकललेली त्याची युपीएससीची मुलाखत 11 ऑगस्टला आहे. तोपर्यंत देवानंद तंदुरुस्त झाला पाहिजे यासाठी सर्वजण प्रार्थना करीत आहेत. सध्या देवानंदचं सर्व कुटुंब त्याच्यासोबतच हैद्राबादला आहे.


देवानंदला वाचविण्यासाठी मित्रांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा : 


 तेलगोटे परिवार आपल्या मुलाच्या कोरोना आजाराने पार सैरभैर होऊन गेला आहे. यातच आयुष्याची अख्खी पुंजीच त्यांनी देवानंदला वाचविण्यासाठी लावली आहे. मुलाचा आजार कमी होत नाही, पैसे संपले अशा परिस्थितीत या परिवाराच्या मदतीला धावून आलेत देवानंदचे मित्र. अन त्यांनीच देवानंदला वाचविण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून स्व:ताला अक्षरश: झोकून दिलं आहे. या मित्रांनी अनेक वाट्सअप गृपवरून देवानंदच्या मदतीसंदर्भातील मदतीचे मॅसेजेस फॉरवर्ड केले आहेत. 'हेल्पींग हँड्स फॉर देवा' हे 'कँपेन' त्याच्या मित्रांच्या माध्यमातून जगभर राबविले जात आहे. यासोबतच हे सर्व मित्र त्याच्या कुटूबियांचा आत्मविश्वास टिकवून ठेवण्यासाठी सातत्याने धडपड करीत आहेत. 


या खात्यांवर करता येईल मदत :


मदतीसाठी संपर्क :-
तेलगोटे परिवाराचे विश्वासु सुमित कोठे (बालमित्र) 
फोन पे, गुगल पे. 8446769704
खाते क्रमांक :- 33135524392 (स्टेट बँक ऑफ इंडिया, तेल्हारा) 
आयएफएससी कोड- SBIN0004818


सुरेश तेलगोटे (देवानंदचे वडील)
खाते क्रमांक :- 11555220514 (स्टेट बँक ऑफ इंडिया, तेल्हारा) 
आयएफएससी कोड- SBIN0004818
फोन पे/गुगल पे. 
7972850635.


    कोरोनानं आपल्या जगण्याचे संदर्भ पार बदलवून टाकलेत. कोरोना काळात माणुसकीची अनेक विपरीत रूपही पहायला मिळालीत. मात्र, देवानंदच्या निमित्तानं माणुसकीचं एक संवेदनशील रूप जगाला पहायला मिळालं आहे. देवानंदला आणखी मदत करीत समाजानं ही सकारात्मक संवेदनेची भावना अधिक दृढ करावी, हिच अपेक्षा. देवानंदच्या उत्तम आरोग्यासाठी 'एबीपी माझा'च्या शुभेच्छा.