Maharashtra Rain : राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे. काही भागात वादली पाऊस झाला तर काही भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली आहे. यामुळं शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दरम्यान, अवकाळी पावसामुळं काही ठिकाी वीज पडून जीवितहानी झाली आहे तर काही ठिकाणी जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
जालना जिल्ह्यात वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या महाकाळा गावा जवळ वीज पडून दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. सायंकाळी विजेच्या गडगडाटासह अंबड तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला. दरम्यान महाकाळा गावांजवळील नाथनगर शिवारात शेतात लिंबाच्या झाडाखाली थांबलेल्या या तरुणावरती वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गोविंद लहाने (वय वर्ष 21)आणि आदित्य बेद्रे (वय वर्ष 20) अशी या मयत तरुणांची नावे आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे महाकाळा गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे तरुण पाऊस सुरू असताना महाकाळा ते साष्ट पिंपळगाव रोडवरील नाथनगर वस्ती येथे लिंबाच्या झाडाखाली थांबले होते. मात्र लिंबाच्या झाडावर वीज कोसळल्याने या दोन तरुणांचा दुर्दैवी अंत झाला आहे.
मालेगावमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वनपट गावात भिंत कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे ही दुर्दैवी घटना घडली आहे. यश प्रवीण शिंदे असे मयत मुलाचे नाव आहे. यश हा इयत्ता आठवीत शिक्षण घेत असल्याची माहिती आहे. गुरांच्या शेडजवळ उभा असताना अचानक भिंत अंगावर कोसळली. या घटनेत यशचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या घटनेमुळे वनपट गावात हळहळ आणि शोककळा पसरली आहे.
बीड जिल्ह्यातील उमापूर शिवारात वीज कोसळून दोन गाई दगावल्या
बीडच्या गेवराई तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने उमापूर शिवारात वीज कोसळून दोन गाई दगावल्याची घटना घडली आहे. शेतकरी ज्ञानेश्वर लाळगे यांनी शेतातील झाडाखाली आपली जनावरं बांधली होती. यावेळी जोरदार वीज कोसळून ज्ञानेश्वर लाळगे यांच्या दोन गाई दगावल्या. घटनेत शेतकऱ्याचे दीड लाखांचे नुकसान झाल्याने पंचनामे करून मदतीची मागणी केली जात आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल भिजला
वर्ध्यात जोरदार पाऊस झाला आहे. अचानक आलेल्या पवसाने उडाली तारांबळ उडाली आहे. हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल भिजला आहे.
परभणीत वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाची हजेरी
परभणी जिल्ह्यात हवामानात अचानक बदल झाला असून वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जिल्ह्याभरात आकाशात काळ्या ढगांची दाटी झाली असून मेघगर्जनेसह जोरदार वारे वाहू लागले आणि त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. शेतात काढून ठेवलेला गहू, ज्वारी, करडई यांसारख्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आंबा व इतर फळबागांनाही या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोनपेठ, जिंतूर, पूर्णा, सेलू आणि गंगाखेड तालुक्यांतही विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि जोरदार वारे सुरू झाले आहेत. काही ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.
वीज पडून खंडाळा तालुक्यात 9 तर वाई तालुक्यातील 15 शेळ्यांचा मृत्यू
सातारा जिल्ह्यात सातारा वाई खंडाळा कोरेगाव जावळी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. वीज पडून खंडाळा तालुक्यात 9 तर वाई तालुक्यातील 15 शेळ्यांचा मृत्यू झाला आहे. सातारा शहरासह वाई, जावळी,खंडाळा, कोरेगाव तालुक्यातील काही भागांमध्ये आज सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि गारांसह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. साधारण अर्धा तास पडलेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले.
खंडाळा तालुक्यातील मोर्वे गावात वीज कोसळल्याने मेंढपाळ अमोल गोपाळ धायगुडे यांच्या 8 शेळ्या आणि 1 मेंढ्याचा जागीच मृत्यू झाला. यात त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वाई तालुक्यातील पांडवनगर (आसले) येथे झाडाखाली आश्रयाला थांबलेल्या मेंढपाळ नंदकुमार पिसाळ यांच्या 15 मेंढ्यांवर वीज कोसळली. या घटनेत लाखो रुपयांचे पशुधन दगावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या अवकाळी पावसामुळे आंब्याच्या मोहरासह, काढणीला आलेल्या गहू आणि ज्वारीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे.सातारा शहरासह ग्रामीण भागातील अनेक भागांत सोसाट्याच्या वाऱ्यामुळे वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत आलेल्या नागरिकांची आणि कामावरून घरी परतणाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.
नाशिकच्या निफाड तालुक्यात तुफान गारपीट
नाशिकच्या निफाड तालुक्यात तुफान गारपीट झाली आहे. शिवडी, उगाव सह परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. निफाडसह सिन्नरच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी पाहायला मिळाली. जोरदार पावसाने शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान, तर नाशिकच्या ग्रामीण भागाला पावसाने झोडपले.
अवकाळीचा पुणे शहराला तडाखा
अवकाळी पावसाचा पुण्याला मोठा फटका बसला आहे. अवघ्या तीन तासांत पुणे शहरात 14 ठिकाणी झाड पडीच्या घटना घडल्या आहेत. बाणेर, गोखलेनगर, येरवडा, सदाशिव पेठ, सोमवार पेठेत झाड पडीच्या घटनांची नोंद झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पुणे शहरात दुपारी 3 ते साडेपाच सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.