Unseasonal Rain अहिल्यानगर: गेल्या काही दिवसांपासून हवामानात मोठे बदल होताना दिसत आहेत. कधी उष्णता तर कधी पाऊस अशी स्थिती आहे. तर सध्या राज्यात अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. भर उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावल्याने लाखो हेक्टर शेती क्षेत्र बाधित झालंय. हे पर्यावरण संतुलन बिघडल्याने पर्यावरण तज्ञ आणि आदर्श गाव कृती समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांनी चिंता व्यक्त केली. हे असेच सुरू राहील तर 2050 मध्ये अभूतपूर्व अन्न आणि पाणी टंचाई निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केलीये.

Popatrao Pawar : माती पाण्यासोबत वाहून जात आहे, ही आपल्यासाठी धोक्याची घंटा

दरम्यान, जो पाऊस 60 दिवसात होणं अपेक्षित असतो, तोच पाऊस 15-16 दिवसात पडतोय. म्हणजेच पावसाच्या पाण्याच्या थेंबाचे आकारमान वाढले आहे, त्यामुळे ढगफुटीसदृश पाऊस होतोय. या पावसामुळे जमिनीला पोषक असणारी माती पाण्यासोबत वाहून जात आहे, ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. असं मत पर्यावरण तज्ञ पोपटराव पवार यांनी व्यक्त केलंय. सोबतच काही ठिकाणी अतिपाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा ताळेबंद आखला पाहिजे. उपलब्ध पाण्याच्या हिशोबाने पिक पध्दतीत बदल करणं गरजेचं आहे. असं मत हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केलंय.

Sindhudurg Rain : तळकोकणात नाचणी पिकावर ढगाळ वातावरणाचे सावट, शेतकऱ्यांची चिंता वाढली

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गावागावात मोठ्या प्रमाणावर नाचणी पिक घेतलं जात. मात्र या नाचणी पिकावर ढगाळ वातावरणाचे सावट निर्माण झाले आहे. वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ आणि पावसाळी परिस्थिती निर्माण झाल्याने काढणीसाठी तयार नाचणी पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. अवकाळी पाऊस पडल्यास नाचणी गळून मोठे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. शेतकरी पारंपरिक पद्धतीने मेहनत करून नाचणीचे उत्पादन घेतात. यंदाही चांगल्या हवामानामुळे नाचणीचे पीक समाधानकारक आले असून अनेक ठिकाणी पीक काढणीसाठी योग्य झाले आहे. मात्र वातावरणात अचानक बदल झाला. ढगाळ वातावरण झाले असून अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Buldhana : बुलढाण्यात अवकाळीचा 201 गावांना फटका, तर 3802 हेक्टरवरील रब्बी पिकांचे नुकसान

बुलढाणा जिल्ह्यात 19 व 20 मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतीतील रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.. या अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील 201 गावांना फटका बसला असून जवळपास 3802 हेक्टर वरील रब्बी पिकांचा नुकसान झाल्याचा प्रार्थमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यातील कमी अधिक प्रमाणात गावांना व शेतीला या अवकाळी पावसाचा फटका बसला. यात गहू, ज्वारी, हरभरा, कांदा तर फळबागांपैकी मोसंबी, संत्रा व निंबू, केळी या पिकांना मोठा फटका बसला आहे. सध्या शेतकरी सरकारच्या मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.

 इतर महत्वाच्या बातम्या