मुंबई : पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, इंदापूर तर कोल्हापूरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. मराठवाड्यात हिंगोली, लातूरमध्ये तर विदर्भात वाशिममध्ये तर उत्तर महाराष्ट्र नाशिक, मनमाडमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. तिकडे कोकणातही पाऊस धो-धो बरसला आहे. दक्षिणपूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.
कोल्हापुरातील अनेक भागांमध्ये आज पावसाच्या सरी बरसल्या. दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरही आज तुफान पाऊस झाला. सलग 2 तास मुसळधार पाऊस पडल्यानं गडावरुन पाण्याचा मोठा प्रवाह वाहत होता.
सांगली जिल्ह्यालाही आज मुसळधार पावसानं झोडपलं. सांगली शहरासह इस्लामपूर, कडेगाव, पलूस, तासगाव, मिरज तालुक्यात दमदार पाऊस झाला. जोरदार पावसामुळे कराड तालुक्यातील साळशीरंबे येथील ओढा दुथडी भरुन वाहत असल्याचं पाहायला मिळालं.
हिंगोलीत आज सकाळपासून ढगाळ वातावरणासह हवेत गारवा निर्माण झाला होता. तर काही ठिकाणी अर्धा तास हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. कनेरगाव नाका परिसरात मात्र जोरदार पाऊस झाला.
वाशिममध्येही आज सकाळी 6 वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली. या पावसाचा फायदा रब्बी पिकाला होणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता मिटली असून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे.
कोकणातही पावसाची दमदार हजेरी
तळकोकणात दुसऱ्या दिवशीही अवकाळी पावसानं हजेरी लावली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वैभववाडी, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी अशा सर्वच भागात आज दमदार पाऊस झाला. अचानक झालेल्या या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडवली. विजांचा कडकडाट व ढगांच्या जोरदार गडगडाटासह, जोरदार पाऊस झाला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. अवकाळी पडलेल्या पावसामुळे आंबा व काजूच्या मोहोरावर रोगाचा पादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच फळांना काळे डाग पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रायगड जिल्ह्यातही काही भागात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्याच्या महाड, पोलादपूर परिसरात परिसरात आज पावसाच्या सरी कोसळल्या. या अवकाळी झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील भातशेतीचं नुकसान झालं आहे.