मुंबई : राज्यात आता आंतरजिल्हा रेल्वे वाहतुकीला देखील परवानगी देण्यात आली आहे. कालच राज्य शासनाने मिशन बिगीन अगेनच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. त्यामध्ये आंतरजिल्हा रस्ते प्रवासा वरील निर्बंध उठवण्यात आले होते. तर आज रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आल्याने, आता रस्ते वाहतुकीसोबत रेल्वे वाहतुकीचा पर्याय देखील प्रवाशांसाठी उपलब्ध झाला आहे.



काल राज्य सरकारने मिशन बिगीन अगेनची नियमावली जाहीर केल्यानंतर आंतरजिल्हा रस्ते वाहतुकीला परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे वाहतूक कधी सुरू होणार याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक इतर राज्यात सुरू असली तरी महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे 22 मार्चपासून आतापर्यंत महाराष्‍ट्रात आंतरजिल्हा रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. याचा अनेक प्रवाशांना मोठा फटका बसत होता. ही वाहतूक सुरू व्हावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. मात्र राज्य सरकार आपल्या निर्णयावर ठाम होती. मात्र कालच्या नव्या नियमावली नंतर आंतरजिल्हा वाहतुकीला परवानगी मिळाल्याने मध्य रेल्वेने आंतरजिल्हा वाहतूक सुरू करायचा निर्णय घेतला आहे. सध्या ज्या 200 स्पेशल ट्रेन संपूर्ण भारतात धावत आहेत केवळ याच ट्रेनचा प्रवास प्रवाशांना करता येणार आहे. तसेच ज्या स्पेशल राजधानी एक्सप्रेस सुरू आहेत त्यांचाही वापर प्रवाशांना करता येईल. इतर ट्रेनच्या सुविधा अजूनही उपलब्ध नसतील.





मध्य रेल्वेने लिहिलेल्या एका पत्रकात राज्य सरकारला ही वाहतूक सुरू करत असल्याचे कळवले आहे. आंतरजिल्हा म्हणजेच महाराष्ट्रातल्या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी रेल्वेने प्रवास करायचा असेल तर रेल्वेने आता जाता येणार आहे. या रेल्वेने प्रवास करायचा असल्यास तिकीट आरक्षित करावी लागेल. हे तिकिटांचे आरक्षण 2 सप्टेंबरपासून मध्य रेल्वे सुरू करणार आहे. मात्र हा प्रवास करत असताना काही नियमांचे पालन प्रवाशांना करावे लागेल. स्टेशनवर आणि ट्रेनमध्ये एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून प्रवास करावा लागेल. ज्यांचे तिकीट आरक्षित झाले आहे केवळ त्यांनाच या ट्रेनमधून प्रवास करता येईल. वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर अनिवार्य असेल.


आंतरजिल्हा रेल्वे सेवा सुरू करण्यात आली असली तरी मुंबई आणि आसपासच्या शहरातील लोकांना मात्र अजूनही दिलासा मिळालेला नाही. कारण लोकल सुरू करण्याबाबत राज्य सरकारने अजूनही निर्णय घेतला नाही. त्याबाबत कधी निर्णय होणार आणि लोकल कधी सुरु होणार असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. सोबत केंद्रसरकारने मेट्रो सुरु करण्यासाठी परवानगी दिली असली तरी महाराष्ट्र सरकारने त्यावर देखील अजूनही बंदी ठेवली आहे. त्यामुळे शहरातील प्रवाशांना लोकल आणि मेट्रो चा वापर करण्यास अजूनही वाट पाहावी लागेल.