सोलापूर : अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात अनेक वर्षांपासून लढा देणारे माहिती अधिकार कार्यकर्ते शरद कोळी यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. शरद कोळी हल्ल्यात जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचर सुरु आहेत. शरद कोळी यांनी गेल्या 10 वर्षांपासून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात लढा उभारला आहे.

पंढरपूर-सोलापूर मार्गावर वाळू माफियांनी शरद कोळी यांच्यावर हल्ला केल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. कोळी यांच्या बंदोबस्ताला असलेल्या दोन पोलिसांवरही हल्ला झाल्याने दोन्ही पोलिस जीवाच्या भीतीने पसार झाले.

सरकार कोणाचंही असलं, तरी मस्तवाल झालेल्या वाळू माफियांना कोणी रोखू शकत नसल्याचं सोलापुरातल्या या घटनेवरुन समोर आलं आहे. वाळू माफियांनी शरद कोळींना जीवे मारण्याची धमकी दिली होती. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असला तरी खलास करु, या शब्दात त्यांना धमकावण्यात आलं होतं.

शरद कोळी हे सोलापूर जिल्ह्यातल्या बेगमपूर गावचे रहिवासी. गेली दहा वर्षे ते वाळू माफियांच्या विरोधात लढत आहेत.  भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन ट्रक पकडून त्यांनी प्रशासनाच्या ताब्यात दिल्या. त्यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकी यायला सुरुवात झाली.

2012 सालीही त्यांच्यावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला होता. तेंव्हापासून कोळींना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा माफियांनी कोळींना गोळ्या घालण्याची धमकी दिली.  मात्र पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करून सोपस्कार पूर्ण केले.

कोळी यांनी कामती पोलीस ठाण्यात रितसर फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला. यापूर्वी सुद्धा शरद कोळींनी वाळू माफियांकडून आलेल्या धमक्यांची तक्रार नोंदवली आहे, पण कारवाई मात्र झाली नाही.

शरद कोळी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील आहेत. माफियांनी  नदीवर चालवलेले अत्याचार त्यांना पाहवले नाहीत. दिवसरात्र होणाऱ्या बेसुमार वाळू उपशाने ते बेचैन व्हायचे. नदी वाचवण्यासाठी गेली 10 वर्षे ते समर्पित भावनेने काम करत आहेत. पण त्यांना आणि कुटुंबाला माफियांकडून धोका निर्माण झाला आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या अशा कार्यकर्त्यांना अभय मिळणं गरजेचं आहे. नाही तर शासकीय यंत्रणेवरचा सामान्य जनतेचा विश्वास उडायला उशीर लागणार नाही.