कोल्हापूर : कोल्हापूरच्या बांबवडे गावात मध्यरात्री अज्ञातांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला. यानंतर बांबवडे गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परवानगी घेऊन पुतळा घेऊन बसवावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. तर आता बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवू नये, आम्ही संरक्षण करु, या भूमिकेवर शिवभक्त ठाम आहेत.


कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यात बांबवडे नावाचं गाव आहे. या गावात शिवरायांचा एकही पुतळा नव्हता. त्यामुळे अज्ञातांनी रविवारी मध्यरात्री शिवरायांचा पुतळा चौकात बसवला. मात्र या कोणत्याही परवानगीशिवाय हा पुतळा बसवल्याने तो हटवून पुन्हा परवानगी घेऊन पुतळा बसवावा, असं मत प्रशासनाचं आहे.


मात्र आता कोणत्याही परिस्थितीत पुतळा हटवू नये. आम्ही या पुतळ्याचं संरक्षण करु, अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली आहे. शिवप्रेमींनी या चौकात पुतळ्याजवळ गर्दी केली आहे. त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.



"काल रात्री किंवा आज पहाटे बांबवडे किंवा आजपासच्या परिसरातील काही शिवप्रेमींनी या चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. हा पुतळा परवानगी घेतल्याशिवाय बसवला आहे, हे आम्हालाही मान्य आहे. पद्धत चुकीची असेल, पण पुतळा महाराजांचा आहे. शिवप्रेमींनी केलेल्या धाडसामागील हेतू प्रामाणिक आहे. त्यांनी अप्रत्यक्षरित्या महाराजांविषयी आदर व्यक्त केला आहे. महाराजांचा इतिहास सांगणारा हा तालुका आहे," अशी प्रतिक्रिया शिवप्रेमींनी व्यक्त केली.


प्रशासनाची भूमिका काय?
तर "हा पुतळा बसवताना आवश्यक परवानगी घेतलेली नाही. पुतळा सध्या हटवा. हा विषय कायदेशीर नाही. त्याला अनेक परवानग्या आवश्यक असतात. त्यामुळे हा पुतळा अशा अवस्थेत ठेवणं हे उचित नाही," अशी प्रशासनाची भूमिका आहे.


'गुन्हा दाखल झाला तरी चालेल पण पुतळा हटवू देणार नाही'
"मात्र प्रशासन ज्या पद्धतीने आदेशाला बांधिल आहेत, त्याचप्रमाणे शिवभक्त म्हणून हा पुतळा इथेच ठेवणं, तो न हटवणं यासाठी आम्ही बांधिल आहोत. पद्धत चुकीची असली तर पुढच्या परवानग्या आम्ही घेऊ. पण महाराजांचा पुतळा बसवलेलं ठिकाण चांगलं आहे. कोणतीही अडचण भासणार नाही. पोलीस स्टेशनच्या दारात पुतळा बसवला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हा पुतळा सुरक्षित आहेत. पुतळ्याची विटंबना होणार नाही, याची जबाबदारी घेण्यास आम्ही तयार आहोत. भलेही आमच्यावर गुन्हे दाखल झाले तरी चालतील पण पुतळा इथून हटवू देणार नाही," अशी भूमिका शिवप्रेमींनी घेतली आहे.