Umesh Patil : नाशिक येथील भोंदूबाबा खरात प्रकरण अत्यंत गंभीर व किळसवाणे आहे. या प्रकरणात कोणतीही तडजोड मान्य नाही. या संवेदनशील प्रकरणाचे राजकारण न करता, न्याय मिळवण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होणे गरजेचे असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी व्यक्त केले. सर्वसामान्य नागरिकांसह रुपालीताईंची देखील अशोक खरातला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशीच मागणी राहणार आहे.

Continues below advertisement

रुपालीताई चाकणकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिला

रुपालीताई चाकणकर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा देऊन त्यांनी स्वतःच निष्पक्ष व पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. ही गोष्ट निश्चितच स्वागतार्ह्य आहे. अर्थात प्रत्येक जागृक व जबाबदार नागरिकाची ती जबाबदारीच आहे. नाशिकच्या भोंदू बाबाकडे जे जे लोक विश्वासाने, श्रद्धेने अथवा शुद्ध आध्यात्मिक भावनेतून गेले होते त्या सर्वांची व सर्वसामान्य नागरिकांसह रूपालीताईंची कॅप्टन खरातला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशीच मागणी राहणार असल्याचे उमेश पाटील म्हणाले. 

या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं

या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी होणं गरजेचं आहे. तसेच  सत्य समोर आलं पाहिजे. दोषींना कठोर शिक्षा व पिडितांना न्याय मिळावा असे उमेश पाटील म्हणाले. या संवेदनशील प्रकरणाचे राजकारण न करता, न्याय मिळवण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे असे पाटील म्हणाले. न्याय होणारच  आणि तो दिसलाही पाहिजे असे ते म्हणाले. 

Continues below advertisement

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर, अनेकांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल

नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण आता अधिक गंभीर वळणावर आहे. त्याच्यावर महिलांचे लैंगिक शोषण, जमिनी हडपणे आणि इतर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत. या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे पोलीस यंत्रणांच्या हाती लागले आहेत. तसेच, खरातचे राजकीय नेत्यांशी संबंध असल्याचेही स्पष्ट झाले आहे. त्याचे काही फोटो आणि पूजा करताना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनेक महिलांचे लैंगिक शोषण त्याने केले. त्याचे 100 हून अधिक व्हिडिओ समोर आले आहेत. इतकेच नाही तर दमदाटी करून, धमक्या देऊन त्याने मोक्याच्या जमिनीही लाटल्याची माहिती समोर येत आहे. त्याचे गोरखधंदे अजूनही बाहेर येत आहेत.  तर या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची पहिली विकेट पडली आहे. त्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.