Ujani Dam : सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंद देणारी मोठी बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरणारे उजनी धरणपूर्ण क्षमतेनं म्हणजे 100 टक्के भरलं आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीनं उजनी धरण खूप महत्वाचे आहे. उजनी धरण 100 टक्के भरल्यानं शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळाला आहे. 

उजनी धरण 100 टक्के भरल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. उजनी धरणात एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 117 टीएमसी पेक्षा जास्त पाणीसाठा झाला आहे. ज्यावेळी उजनी धरणात 117 टीएमसी पाणीसाठा होतो, त्यावेळी ते शंभर टक्के क्षमतेने भरलं जातं. उजनी जरी 100 टक्के भरलं असलं तरी उजनी मध्ये 121 टीएमसी पर्यंत पाणी साठवण्याची क्षमता आहे. उजनी भरल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. गेल्या काही वर्षापासून उजनी धरण हे 100 टक्के भरत असलं तरी उन्हाळ्यात मात्र पाणी पातळी खालावते. त्यामुळं अनेक शेतककऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. 

उजनी धरण पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत

जलसंपदा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, धरणाच्या पाणलोट परिसरात झालेल्या सलग पावसामुळे पाणीपातळी सातत्याने वाढली. गेल्या काही दिवसांत धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसाला लाखो घनमीटर पाण्याची वाढ होत होती. उजनी धरण हे नदी आणि कालव्यांच्या माध्यमातून पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत आहे. गेल्या काही वर्षांत पावसाचे अनियमित प्रमाण, वारंवार पडणारे दुष्काळी सावट आणि वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे उजनी धरण भरण्यासाठी पूर्ण क्षमता गाठणं अवघड झालं होतं. मात्र यावर्षी पावसाळ्याच्या पहिल्या टप्प्यातच चांगल्या पावसामुळे धरणात जलसाठा जलद गतीने वाढत गेला.

धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्यानं शेतकरी समाधानी

दरम्यान, यंदा उजनी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच जून महिन्यात उजनी धरणाने शंभरीच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. जून महिन्यातच धरण 75 टक्के क्षमतेनं भरलं होतं. चांगला पाऊस झाल्यानं उजनी धरणात वेगाने पाणी जमा होऊ लागले आहे. दरम्यान, जुलै महिन्यात पावसानं काही प्रमाणात उघडीप दिली होती. बहुतांश ठिकाणी चांगला पाऊस झाला नव्हता. मात्र, ऑगस्ट महिना सुरु होताच राज्याच्या विविध भागात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तर धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी सुखावला आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Chandrabhaga River: चंद्रभागा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ; वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली; सहा भाविक थोडक्यात बचावले