Maharashtra Dam water Update: राज्यभर गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय. धरणक्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक धरणे भरून वाहू लागली आहेत. उजनी, गोसेखुर्द, नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांतून सध्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काही ठिकाणी संपर्क तुटल्याचीही माहिती आहे. आषाढी एकादशीनंतर आता उजनी धरणातून पुन्हा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. गोसीखूर्द धरणाचे आज दोन दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. काय परिस्थिती आहे पाहुया..
उजनी धरणातून आज विसर्ग सुरू होणार
उजनी धरणाची पाणी पातळी 85% टक्के पर्यंत पोचल्याने आज उजनी धरणातून सकाळी पाणी सोडावे लागणार आहे. आज आषाढी द्वादशी असून लाखो भाविक सोहळा संपवून परतीच्या मार्गाला लागले आहेत .. आषाढी सोहळ्यात महापुराचा धोका नको म्हणून प्रशासनाने नियोजन करून उजनीतून पाणी सोडणे बंद केले होते .. मात्र आता उजनी धरणाकडे मोठ्या प्रमाणात पाणी येऊ लागल्याने आज उजनी धरणातून 10 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ..
वीर धरणातूनही जवळपास 5000 क्युसेक विसर्गाने पाणी भीमा नदीकडे सोडले असून आता आज पाणी सोडल्यास 21 तासानंतर म्हणजे यात्रेची गर्दी पूर्ण कमी झाल्यानंतर उजनीचे पाणी पंढरपूर मध्ये चंद्रभागेत पोहोचणार आहे. सध्या उजनी धरणात 15000 क्युसेक विसर्गाने पाणी येत असून पुणे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला व इतर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे उजनीची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने आता उजनी धरणातून आज पाणी सोडावे लागणार आहे
गोसेखुर्द धरणाचे दोन दरवाजे उघडले
गोसीखुर्द धरणाचे आता केवळ 2 दरवाजे अर्धा मीटरनं सुरू ठेवले असून त्यातून 13, 683 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. काल गोसेखुर्द धरणाचे 15 गेट सुरू होते. आज 48456 एवढा क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. हवामान खात्यानं आज भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळं गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस मुसळधार कोसळल्यास परिस्थिती बघून गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गात आणखी वाढ करण्याची शक्यता, गोसेखुर्द धरण प्रशासनानं व्यक्त केली आहे.
नाशकात 13 धरणांमधून विसर्ग सुरु
नाशिक शहर व परिसरात मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून 5186 क्युसेक, दारणा धरणातून 13160 क्युसेक आणि इतर धरणांतून देखील मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. नांदूरमध्यमेश्वरमधून तब्बल 39172 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
नाशिक जिल्ह्यात आजचा एकूण पाणीसाठा 71.41% टक्के झाला आहे. जिल्ह्यातील 23 धरणांपैकी 7 धरणे 100% भरली आहेत, तर 13 धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत फक्त 11.62% साठा होता, त्यामुळे यंदा तब्बल 60 टक्क्यांनी साठ्यात वाढ झाली आहे.
गोदाकाठची गावं जलमय; नागरिकांची गैरसोय
गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, त्यामुळे गोदाकाठवरील रस्त्यावर पाणी येऊ लागले आहे, त्यामुळे इथे येणाऱ्या भाविकांची नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, गोदा काठवरील पूजा साहित्यची छोटी दुकाने टपरी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आल्या आहेत. रोज ज्या ठिकाणी प्रसाद वाटपाचे काम केले जाते, तिथेच आज पाणी असल्याने इतर ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. पाण्यातून भाविकांना ये जा करावी लागत आहे, पाण्याचा जोर जर वाढलातर पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे.