Shiv Sena 59th Foundation Day : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी मुंबईत स्थापन केलेल्या शिवसेनेचा 59वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. पण 2022 साली एकसंध शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडामुळं यंदा सलग तिसऱ्या वर्षी शिवसेनेच्या वर्धापनदिनाचे दोन सोहळे मुंबईत साजरे करण्यात आले. मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा आणि वरळीच्या एनएससीआय डोममध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा. त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे, भाजप आणि नरेंद्र मोदी-अमित शाहांवर जोरदार टीका केली.
1. मनसेसोबत युतीचे संकेत
जे राज्याच्या मनात आहे ते करणारच, असं सांगून उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मनसेसोबतच्या संभाव्य युतीबाबत सूचक वक्तव्य केलं. तसंच राज ठाकरेंशी भेटीगाठींवरून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी खरमरीत टीका केली.
2. भाजपला अदानीसाठी मराठी माणूस एकत्र नको
भाजपला त्यांच्या मालकाला मुंबई द्यायची आहे म्हणून मराठी माणूस एकत्र नको आहे. मराठी माणूस एकत्र आला तर मुंबई त्यांच्या हातून जाणार आणि मग त्यांच्या मालकाचे काय होणार याची चिंता देवेंद् फडणवीस यांना लागली आहे. त्यामुळेच ते हॉटेलमध्ये कुणाकुणाच्या भेटी घेत आहेत असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
3. ठाकरे ब्रँड संपणार नाही
ठाकरे ब्रँड पुसायला निघालात तर भाजपचं नामोनिशाण मिटवू, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. आजपर्यंत अनेक लोक फोडले, त्यावेळी उद्धव ठाकरे संपतील असं त्यांना वाटलं. उद्धव ठाकरे कधीच संपणार नाही, आम्ही तुम्हाला संपवू.
4. हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही
हिंदी सक्तीचा करण्याची गरज काय? हिंदीला आमचा विरोध नाही, पण हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही. हिंदी सक्ती करायची तर ती गुजरातमध्ये करा. निवडणुकीच्या तोंडावर मराठी आणि अमराठीमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम भाजपने केला. म्हणजे हे भ्रष्टाचार करायला मोकळे.
5. अमित शाह घरफोड्या
उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. देशाला पंतप्रधानांची गरज आहे, पण नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधान आहेत. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे, पण अमित शाह हे घरफोड्या असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.
6. तुझी उंची किती? नितेश राणेंवर टीका
तुझी उंची पेंग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी मत्स्योद्योगमंत्री नितेश राणे यांच्यावरही हल्लाबोल केला. तुझी लायकी काय आणि तू बोलतो कुणावर असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
7. ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर मोदी शांत
पाकिस्तानविरोधातील युद्धात भारतीय लष्कर जिंकत असताना अचानक अमेरिकेतून फोन आला आणि युद्ध थांबवलं. ट्रम्प यांचा फोन आल्यानंतर मोदींचा आवाज गेला. वॉर रुखवा दी पापा.
8. अतिरेकी कुठे गेले?
पहलगाम हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा जीव घेणारे अतिरेकी कुठे पळून गेले? त्यांना पकडता का आलं नाही असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. चार अतिरेकी आत आले कसे? संरक्षण मंत्री, गृहमंत्री गेले कुठे? अतिरेकी पातळात गेले, आकाशात गेले की भाजपमध्ये गेले?
9. ज्यांच्यावर आरोप केले ते भाजपमध्ये
ज्यांच्यावर भाजपने आधी भ्रष्टचाराचे आरोप केले, एसआयटी लावू म्हणाले, त्यांनाच भाजपमध्ये घेतलं. आता कुठे गेली एसआयटी? एसटीत गेली की काय? आता केवळ दाऊदला पक्षात घायचं बाकी आहे. भाजपने जेलच्या बाहेर सदस्य नोंदणीसाठी स्टॉल टाकले आहेत.
10. तुमचं हिंदुत्व काय ते सांगा?
तुमच हिंदुत्व काय आहे हे भाजपला मला विचारायचे आहे. सिंदूर वाटणाऱ्या त्या भाजप नेत्याला चाबकाने फोडायला हवे. कर्नल कुरेशी यांना पाकिस्तानची बहीण म्हणतो. अशा अवलादी भाजपच्या आहेत.
ही बातमी वाचा: