Uddhav Thackeray on Shaktipeeth Expressway: “एका शेतकऱ्याची जमीन पूर्णपणे खरडून गेलेली असताना त्याच्याच उरावर उभं राहून मी काय सांगू, तुझ्या जमिनीवरून शक्तिपीठ महामार्ग नेतोय? हा विकास आहे का विनाश?” असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. ठाकरे म्हणाले की, “आज शेतकऱ्याची जमीन खरडून गेली आहे. काल एका भागात हे झालं, आज दुसऱ्या भागात होतंय. प्रत्येक वेळी शेतकऱ्याचं भविष्य उद्ध्वस्त होतं. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी महामार्गात जात आहेत. या प्रकल्पाची कोणाचीही मागणी नाही. तरीही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात आहेत. ही मागणी नसलेली योजना आहे.”
नारळ फोडतानाचं खर्चाचं गणित 86 हजार कोटी रुपये
ठाकरे यांनी प्रकल्पाच्या खर्चावर आणि सिमेंट वापरावर थेट हल्ला चढवला. “शक्तिपीठ महामार्गासाठी लागणारं सिमेंट तब्बल 12 कोटी बॅग आणि नारळ फोडतानाचं खर्चाचं गणित 86 हजार कोटी रुपये. आता सिमेंट कोणाचा वापरणार हे बघा, मग समजेल की हा मार्ग कोणासाठी आहे. विकास कोणाचा होतोय हे स्पष्ट दिसेल,” असं ते म्हणाले. “सिमेंट अदानीचं आहे,” ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं. त्यांनी पुढे सांगितलं, “मुंबईजवळ कल्याण-डोंबिवली येथे अदानीला सिमेंट कारखान्यासाठी मोठी जमीन देण्यात आली आहे. तिथे प्रदूषणामुळे स्थानिक विरोध करत आहेत. तरी पंतप्रधानांनी नियम बदलून अदानी कंपनीला ती जमीन दिली आहे. म्हणजे सगळं गणित तयार आहे. महामार्ग, सिमेंट आणि लाभार्थी एकाच रेषेत उभे आहेत.”
माझा शेतकरी भिकेला लागेल
ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या भविष्यासंबंधी गंभीर इशारा दिला. “जमिनी गेल्या की माझा शेतकरी भिकेला लागेल. त्याच्या हातात भिकेचा कटोरा यायचा बाकी आहे. हा शक्तिपीठ महामार्ग नाही, हा व्यक्तिपीठ महामार्ग आहे. जमिनी गेल्या, शेतकरी कंगाल झाला, आणि त्याच्या विनाशावर काही लोकांचा विकास उभा राहतोय,” असा प्रहार ठाकरे यांनी केला. ते म्हणाले, “या महामार्गाला विरोध आहे, आणि हा विरोध योग्य आहे. कारण हा मार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनींचं नुकसान करून केलेला विकास म्हणजे विनाश. हा विकास नाही, हा विनाश आहे.”
इतर महत्वाच्या बातम्या