मुंबई : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषण करणाऱ्या मनोज जरांगेंच्या (Manoj Jarange)  उपोषणाचा आजचा पाचवा  दिवस आहे. मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण 25 ऑक्टोबरपासून सुरू आहे.  राज्यात काही ठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचे प्रकार समोर आले आहेत.  यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील सरकारला धारेवर धरले आहे. आरक्षणासाठी मराठा समाजातील बांधव रोज आत्महत्या करत आहेत. समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? असा संतप्त सवाल केला आहे.


उद्धव ठाकरे  म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करीत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चूड लावत आहेत. मराठा समाज त्यांचा हक्क मागत आहे आणि त्यांना त्यांचा हक्क मिळायला हवा.ओबीसी,आदिवासीसह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर, समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे. जरांगे पाटील उपोषण करत आहेत पण आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करत आहेत. समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करत आहे. पण त्यांचे मन निर्दयी आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही. 


संजय राऊतांच्या नियोजित दौऱ्यात बदल 


संजय राऊत आज दौंडच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या नियोजित दौऱ्यात काही बदल करण्यात आला आहे. संजय राऊत दौंडमध्ये येताच मराठा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यामुळे राऊतांच्या नियोजित दौऱ्यात बदल करण्यात आला आहे.. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होते.  मात्र मराठा संघटनांच्या आक्रमक भूमिकेनंतर बाईक रॅली रद्द करण्यात आली..यावेळी मराठा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संजय राऊतांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  


साखळी उपोषणाचे आमरण उपोषणामध्ये रूपांतर 


 मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. जरांगे यांनी आवाहन केल्याप्रमाणे आजपासून (28  ऑक्टोबर) राज्यभरातील गावागावात सुरु असलेल्या साखळी उपोषणाचे आमरण उपोषणामध्ये रूपांतर होणार आहे. जरांगे यांनी पाणी घेऊन अमरण उपोषण करण्याचे आवाहन मराठा आंदोलकांना केले आहे. दरम्यान नियोजन करणाऱ्या आंदोलकांनी तसेच वयोवृद्ध नागरिकांनी आमरण उपोषण करू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.  


आंतरवालीत गर्दी वाढली...


मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी दुसऱ्या टप्प्यात पुन्हा एकदा आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. त्यामुळे राज्यभरातील मराठा समाजातील बांधव आंतरवाली सराटी गावात गर्दी करतांना पाहायला मिळत आहे. सोबतच परिसरात असलेल्या गावातील गावकरी देखील उपोषणास्थळी येत आहे. आज पाचव्या दिवशी तर सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी करायला सुरवात केली आहे.  


हे ही वाचा :


मराठवाड्यात आंदोलन पेटलं! जालन्यात तहसीलदाराची गाडी फोडली; विभागातील बस सेवाही बंद