Uddhav Thackeray on Eknath Shinde: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. महायुतीमधील फोडाफोडीच्या राजकारणावर ते म्हणाले की, “एक कोणतरी गेलं, बाबा मला मारलं म्हणून दिल्लीला. ही लाचारी चांगला शिक्षक मिळाला असता तर आली नसती. तांदळातून खडे निवडायचे का खड्यातून तांदूळ हे शिकवण्याचं काम शिक्षकांचंच आहे”, अशी जाणीव प्रत्येक पिढीला करून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दिवट्यांना मशालीचं महत्त्व कळत नाही
उद्धव ठाकरे म्हणाले की, “दिवट्यांना मशालीचं महत्त्व कळत नाही. शिक्षण नसेल तर राजकारण हे फक्त तोडफोडीच्या भोवऱ्यात अडकतं.” आमदार निधीच्या वापराबाबत त्यांनी आमदारांना थेट आदेशवजा सूचना दिल्या की, “तुमचा निधी असेल तो फक्त शिक्षणासाठीच वापरा.” “मुलांना तयार करण्याची जबाबदारीच नाही. पक्ष फोडायचे, आमदार-खासदार उडवायचे, खुर्ची मिळाली की बाकीचं जग खड्यात!” आजोबा आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शाळा सोडण्याच्या प्रसंगाचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, “शाळा सुटली तरी त्यांचं शिक्षण थांबलं नाही. संस्कारांचं मोल त्यांना माहिती होतं.” मुलांमध्ये येणारे संस्कार पालकांच्या वर्तनातूनच घडतात यावरही त्यांनी वेधक भाष्य केले. मातृभाषेवर प्रेम व्यक्त करत ते म्हणाले, “आपली अक्षरं आईने हात धरून गिरवली म्हणूनच तिला मातृभाषा म्हणतो.”
दुसरा देईल ते रेवडी, आम्ही दिलं तर उपकार
“रेवडी संस्कृती”वर त्यांनी कडाडून टीका केली. “आज राजकारण म्हणजे दुसरा देईल ते रेवडी, आम्ही दिलं तर उपकार. फुकट कॉम्प्युटर वाटणार, पण त्यात टाकणार काय? कोरी वही दिली तर कोणी होळ्या करेल, लिहायला काय देणार?” असे ते म्हणाले. मुलांवर वाढणाऱ्या दप्तराच्या ओझ्याचा उल्लेख करत त्यांनी शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न आठवले, “अरे, मुलं आहेत की गाढवं आहेत? एवढं ओझं का वाहायला लावता?”
वर्षांत महापालिकेचा बाप कोण हेच कळत नाही
मुंबई महापालिकेच्या सध्याच्या व्यवस्थेवरही त्यांनी थेट प्रहार केला. “गेल्या तीन-चार वर्षांत महापालिकेचा बाप कोण हेच कळत नाही. आत काय चाललंय, कोणालाच कळत नाही,” असा त्यांनी सवाल केला. मात्र, शिवसेनेच्या कार्यकाळात महापालिका शाळांमध्ये झालेले बदल आठवत त्यांनी सांगितले की, “आदित्यच्या कामामुळे पहिल्यांदाच महापालिका शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या.” दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना मांडत त्यांनी “एक चांगला शिक्षक स्टुडिओतून सर्व शाळांना शिकवू शकतो,” असे सांगितले. मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे दुःख मांडताना त्यांनी एका शेतकरी महिलेची वेदना व्यक्त केली. “मुलींचं शिक्षण फुकट आहे म्हणतात, पण फी भरायला पैसे नाहीत. घरात काहीच नाही, मुलींना शिकवायचं कसं?” या कुटुंबाची जबाबदारी शिवसेनेने घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या