Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad Top 10 Points :  शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज महापत्रकार परिषद (Uddhav Thackeray Maha Patrakar Parishad) घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narwekar) आमदार अपात्रता प्रकरणात (Shiv Sena MLA Disqualification Case)  दिलेला निकाल कसा चुकीचा होता याबाबतचे दावे केले. त्यासोबतच त्यांनी भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे पाहूयात...


1. सुप्रीम कोर्टाकडून आता शेवटची आशा आहे. लोकशाहीचा मूलभूत घटक असणाऱ्या जनतेच्या न्यायालयात आपण आलो आहोत. सरकार कोणाचंही असलं तरी, सत्ता ही सामान्य जनतेचीच असली पाहिजे. 


2. माझं आव्हान आहे. नार्वेकरांनी, मिंध्यांनी माझ्यासोबत जनतेमध्ये यावं आणि तिथं सांगावं शिवसेना कुणाची? मग जनतेने ठरवावं कोणाला पुरावा, गाडावा की तुडवावा. शिवसेना जर तुम्ही विकली असाल; तर मी जिथे जिथे जातो, तिथे तिथे शिवसैनिक माझ्यासोबत कसे?


3. राज्यपालांना विनंती करतो, एक अधिवेशन पुन्हा बोलवा आणि मिंध्यांना सांगतो; विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणा, मी तुम्हाला पाठिंबा देतो. हाकला त्यांना!


4. व्हीपचा अर्थ आहे चाबूक! चाबूक लाचारांच्या हातात शोभत नाही. शिवसेनाप्रमुखांच्या आणि शिवसैनिकांच्या हातात शोभतो!


5. आपण निवडणूक आयोगावर एक केस करायला पाहिजे. आपण शपथपत्र आणि प्रतिज्ञापत्र लिहिली होती. मग सरकारने गाद्या पुरवल्या नाहीत, म्हणून निवडणूक आयोग त्यांना गाद्या समजून झोपलंय का?


6. मला सत्तेचा मोह नव्हता; एका क्षणात मी वर्षा सोडलं आणि एका क्षणात मुख्यमंत्री पदही सोडलं. राज्यपालांनी जे अधिवेशन बोलवलं होतं, ते असंविधानिक होतं. आपल्या देशात लोकशाही जिवंत राहणार की नाही, सुप्रीम कोर्ट अस्तित्वात राहणार, की लवाद त्याच्या डोक्यावर बसणार; हे पाहण्याची ही लढाई आहे. 


7. सुप्रीम कोर्टाचा आदेश सर्वोच्च मानायचा, की लबाडाचा आदेश सर्वोच्च मानायचा; ही लढाई उद्या होणार आहे. आमच्या पात्र अपात्रतेचा निर्णय माझी जनता घेईल; ते म्हणतील त्या दिवशी मी घरी बसेन.पण लोकशाही जिवंत रहाणार आहे की नाही?


8. कोर्ट फाशीची शिक्षा सुनावतं; पण प्रत्यक्ष अमलात आणतो जल्लाद! त्या जल्लादाचं काम ह्या लवादाला दिलं होतं. सुप्रीम कोर्टाने तयारी करून दिली, पण लवाद म्हणतो; ह्यांना फाशी कशी देऊ? ह्यांच्या जन्माचा दाखलाच नाही. पण कोर्टाने जन्माचा दाखला तपासण्यास  नाही तर, जो गुन्हा केलाय त्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं. 


9. जर 1999 नंतर शिवेसनेची घटनाच अस्तित्वात नव्हती तर 2014 साली मला कशाला मोदींना पाठिंबा द्यायला पाठवलं होतं? 2019 साली कशाला सहीसाठी बोलावलं होतं? तिकडेच ढोकळ्यावाल्याची सही घ्याची होती ना असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. मिधे-फिंद्यांना कुणी पदं दिली, माझं मत हे अवैध असेल तर अमित शाह कशाला मातोश्रीवर आलेले असाही उद्धव ठाकरे यांनी प्रश्न विचारला. शिंदे म्हणाले की उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना घरगड्यासारखे वागवतात. मग असा कोणता घरगडी आहे जो हेलिकॉप्टरने शेती करायला जातो असा प्रश्नही त्यांनी विचारला.


10. जे पी नड्डा म्हणाले होते की, देशात एकच पक्ष राहणार आहे. फक्त भाजप पक्ष राहणार असल्याचे ते म्हणाले होते आणि त्याची ही सुरवात आहे. एका पक्षाचा अध्यक्ष उघडपणे सर्व पक्ष संपवून जाणार असल्याचे सांगत आहे. हे खूप घातक असून, लोकशाहीच्या खुनाची सुरुवात झाली आहे.