Uddhav Thackeray: ज्यावेळेला खासदार निवडून आले, तेव्हा मीच दौरा केला होता आणि मीच दौरा केल्यानंतर माझ्याच शब्दावर हे खासदार निवडून आले होते, तेव्हा यांना घरी बसवलं होतं, जे हारले होते ते बोंबलतायत, त्यांचा बेंबीचा देठ कुठपर्यंत आहे मला माहिती नाही, पण तिथपासून हे बोंबलतायत, आता दौरा करून फायदा नाही, पण मी दौरा केला होता म्हणूनच हे खासदार निवडून आले होते, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली.
क्षमा मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरणार
उद्धव ठाकरे म्हणाले, आजपासून मी या सर्व गद्दारांच्या मतदारसंघातील माझ्या कट्टर शिवसैनिकांना भेटण्यासाठी आणि त्याचबरोबरीने इथल्या ज्या मतदारांनी केवळ आणि केवळ शिवसेनेवर, शिवसेनाप्रमुखांचा चेहरा बघून आणि मशाल बघून आम्ही जो उमेदवार दिला, त्याला त्याचं काही पार्श्वभूमी किंवा इथं काही न बघता निवडून दिलं, त्या सर्व मतदारांची आणि शिवसैनिकांची मी माफी मागेन किंवा क्षमा मागण्यासाठी महाराष्ट्रामध्ये फिरणार आहे. मागील बंडखोरीचा संदर्भ देत ते म्हणाले, तेव्हा सर्वत्र गावात, खेड्यापाड्यात सभा गाजली होती. अगदी मला आठवतंय विदर्भामध्ये बैलपोळ्याच्या दिवशी बैलांवरती सुद्धा ते लिहिलं गेलं होतं. आता आमदारांना जर तेव्हा 50 कोटी दिले गेले असं म्हणत असतील, तर खासदारांना किती दिले गेले असतील? हा एक हिशोब ज्याला लावायचा तो लावू शकतो.
त्यांना मात्र भरघोस हमीभाव मिळालाय
उद्धव ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात जाऊन सभा घेणार आहेत. आज (27 जून) ते यवतमाळमध्ये पोहोचले आहेत. ते म्हणाले की, काही शेतकऱ्यांनी मला एक निवेदन दिलं. पीक विम्याचा पत्ता नाही, हमीभाव मिळतोय की नाही माहित नाही म्हणत होते. म्हणजेच शेतकऱ्याला त्याच्या मालाला हमीभाव नाही, पण आमच्या भरोशावर जे निवडून आलेले खासदार आहेत, त्यांना मात्र भरघोस हमीभाव मिळालाय. त्यामुळे या सगळ्या उपटसुंभांनी आमच्यावर टीका करण्याचं धाडस करू नये, असा टोला त्यांनी लगावला. दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांची नागपूर दौऱ्यात विमानातील भेटीवर त्यांनी खोचक भाष्य केले. ते म्हणाले की, आमची आणि मुख्यमंत्र्यांची विमानामध्ये उच्च दर्जा उच्च स्तरीय चर्चा झाली. येत्या काही दिवसांत कळेल. कालच्या बैठकीचा वृत्तांत किंवा जे काही ठरलं ते येत्या काही दिवसांत कळेल.
इतर महत्वाच्या बातम्या
