Maharashtra Politics: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 40 बंडखोर आमदारांच्या विरोधात जशी तयारी करत आहेत तशीच तयारी आता 12 खासदारांच्या विरोधातही सुरु झाली आहे. 12 पैकी जवळपास 5 लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. 


राज्यात एकूण 48 लोकसभा मतदारसंघ आहेत. त्यात शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गट गाठला. त्यानंतर ठाकरेंकडे उरले 6 खासदार. याच 6 खासदारांसोबत उद्धव ठाकरेंना भरारी घ्यायची आहे आणि पुन्हा केंद्रात ठाकरेंची ताकद दाखवून द्यायची आहे. उद्धव ठाकरेंनी लोकसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठका आणि माजी खासदार आमदारांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. 


या पाच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा आढावा पूर्ण


बंडखोर खासदारांच्या विरोधात रणनीती आखायला ठाकरेंनी तयारी केली आहे. त्यापैकी हिंगोली, यवतामळ-वाशिम, शिर्डी, मावळ आणि रामटेक लोकसभा मतदार संघाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आलीय. 12  बंडखोर खासदारांपैकी हेमंत पाटील, हिंगोली, भावना गवळी यवतमाळ वाशिम, सदाशिव लोखंडे शिर्डी,  श्रीरंग बारणे मावळ आणि कृपाल तुमाने रामटेक या पाच खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंचा आढावा पूर्ण झालेला आहे. एवढंच नव्हे तर काही पदाधिकाऱ्यांना तयारीचे आदेश देण्यात आले आहेत.  ठाकरे गटाच्या काही महत्त्वाच्या नेत्यांना  या पाच मतदारसंघात तयारीला लागण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
 
यामध्ये बंडखोर खासदारांच्या कट्टर विरोधी कार्यकर्त्यांना ताकद देण्यात आली आहे. तर यामध्ये काही माजी खासदार आणि आमदारांचाही समावेश आहे. 12 बंडखोर खासदारांच्या मतदार संघासाठी ठाकरे टीम बनवत आहेत . ज्यामध्ये गटप्रमुखापासून ते नेत्यांपर्यंत सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. 12 मतदार संघात जिल्हा प्रमुख आणि जिल्हा संपर्कावर मोठी जबाबदारी असणार आहे. तसेच विधानसभा संपर्कप्रमुखांवर स्थानिक कार्यकर्त्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे


भाजपचंही मिशन 48 सुरु  
याआधी उद्धव ठाकरे भाजपच्या साथीनं लोकसभा निवडणूक लढले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या त्यांच्या खासदारांच्या विजयात भाजपचाही वाट राहिला होता. पण आता सर्वच चित्र बदललं आहे. ठाकरे महाविकास आघाडीसोबत आहेत. त्यामुळे यंदाची लोकसभा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत की स्वबळावर लढणार हा सस्पेन्स कायम आहे. दुसरीकडे भाजपनं आपलं मिशन 48 सुरु केलं आहे प्रत्येक मतदारसंघात भाजपचे खासदारांनी फिरायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असो किंवा ठाकरेंचे उमेदवार किंवा भाजप हे सर्वच जण आपापलं मिशन यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.