औरंगाबाद: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत शेतकऱ्यांशी संवाद साधला. उद्धव यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील माळीवाडा येथील शेतकऱ्यांची भेट घेतली.
राज्यातला शेतकरी खरंच कर्जमुक्त होतोय का हे पाहण्यासाठी मी फिरतोय, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
कर्जमुक्ती आम्हीच केले हे सांगण्याची स्पर्धा लागली आहे. ज्यांनी शेतकऱ्यांची हेटाळणी केली, तेच कर्जमुक्ती आम्ही केली म्हणून होर्डिंग लावत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
मध्य प्रदेशात शेतकऱ्यांना साथ देण्यासाठी कोणीही नव्हते, मात्र महाराष्ट्रात शिवसेनेची साथ आहे. कोणत्या गावातील किती शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला हे सगळ्या शेतकऱ्यांना पारदर्शक कळले पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
गॅसची सबसिडी किती लोकांनी नाकारली हे तपासत आहे. गॅस सबसिडी नाकारणारे 2 कोटी कुठे आहेत? तसेच शेतकऱ्यांचे होईल. कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी बँकेच्या बाहेर लावा. जे कर्जवसुलीसाठी गावागावातील शेतकऱ्यांच्या समोर ढोल लावत होते, त्यांना आता सांगा. सगळं पारदर्शक मला कळले पाहिजे, हे जर होत नसेल तर हा भंपकपणा आहे, असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
मध्यावधीच्या निवडणुकीचा जितका खर्च होणार आहे, तितके पैसे शेतकऱ्यांना द्या. 40 लाख कर्जमुक्त शेतकऱ्यांची यादी मला पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
जे कर्जमुक्तीचं होतंय तेच समृद्धी महामार्गचं होणार आहे. तुमची कागदावरची रेषा ही शेतकऱ्यांच्या आयुष्याची रेषा संपवेल. समृद्धी महामार्गापेक्षा आधी जो मार्ग आहे, तो रुंद करा.
'समृद्धी'साठी सरकारने आमच्यावर आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला.