Maharashtra Politics: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे खासदार आणि सचिव अनिल देसाई (Anil Desai) यांचे निकटवर्तीय, आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची संघटना आणि प्रशासकीय कामाची इत्यंभूत माहिती असलेले माहीतगार मारुती साळुंखे (Maruti Salunkhe) यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला. मुख्यमंत्र्यांनी हातात भगवा झेंडा देत साळुंखे यांचे पक्षात स्वागत केलं.
मारुती साळुंखे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सचिव आणि खासदार अनिल देसाई यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. गटातील आणि संघटनेची घडी कशी बसवावी तसेच प्रत्येकाशी संपर्क ठेवून संघटना तळागाळात कशी पोहचवावी याची जबाबदारी ही त्यांच्या खांद्यावर होती.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध उठाव करून एकनाथ शिंदे वेगळे झाल्यानंतरही संघटनेची नव्यानं बांधणी करण्यासाठी मारुती साळुंखे यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या. मात्र गेल्या काही दिवसांपासून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीशी सलगी करून घेतलेली भूमिका त्यांना पटेनाशी झाली होती. तसेच बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जायचं असेल तर एकनाथ शिंदे यांच्या अधिपत्याखालील शिवसेनेत जाण्यावाचून दुसरा पर्याय नाही, हे त्यांनी ठरवलं आणि त्यानंतर शिवसेनेत (शिंदे गटात) जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मारुती साळुंखे यांनी दिली आहे.
साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे पक्षाची नव्यानं बांधणी करण्याच्या कामाला बळ मिळणार आहे. तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित झालेली संघटना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी त्यांचा मोठा उपयोग होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचं पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सोबत मिळून संघटना अधिक जोमानं वाढवू असंही सांगितलं.
मारुती साळुंखे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून संघटनेची अचूक बांधणी करणारा एक मोहरा शिंदे यांना मिळल्यानं पक्षवाढीसाठी त्याचा त्यांना मोठा उपयोग होणार आहे. काल (रविवारी) पक्षप्रवेशावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे यादेखील उपस्थित होत्या.