नागपूर : संधी मिळाली तर एकटा असला तरी सभागृह डोक्यावर घेता येतं. छगन भुजबळ आपल्याकडे होते तेव्हा ते एकटे सभागृह डोक्यावर घ्यायचे. त्या पद्धतीनेच आता काम करा अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांना दिल्या. सत्ताधाऱ्यांकडे संख्याबळ असलं तरी त्यांच्याकडे नाराजीदेखील मोठी आहे. तुम्ही मात्र एकजुटीने काम करा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिल्या.
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असून त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी आपला सहभाग नोंदवला. पक्षाच्या आमदारांना मार्गदर्शन करताना त्यांनी छगन भुजबळांचे उदाहरण दिलं. ते म्हणाले की, आपल्यासमोर फडणवीस असले तरी माझे 20 आहेत हे मी अनेकवेळा बोललो आहे. आताही तेच सांगतोय. अनेकजण आपल्यापैकी एकटे-एकटे होते तेव्हा त्यांनी सभागृह डोक्यावर घेण्याचं काम केलं आहे. आपल्याकडे भुजबळ होते तेव्हा ते एकटे सभागृह डोक्यावर घ्यायचे. संधी मिळाली की सोनं करता येतं. एक जरी असला तरी सभागृह डोक्यावर घेता येतं. विधानसभेत मिळणारी पुस्तिका तुम्ही घ्या, त्यातील नियमावली समजून घ्या.
मी सभागृहात असायचो त्यावेळी काही समजलं नाही तर ते अनिल परब यांना विचारायचो. त्याखाली सुनील प्रभु यांना विचारायचो. तुम्हीही नियमावली समजून घ्या असं उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांच्याकडे संख्याबळ खूप असलं तरी त्यांच्याकडे नाराजी देखील खूप आहे. तुम्ही मात्र एकजुटीने राहा. काम करताना आपल्याला कोणाच्याही वैयक्तिक भानगडीत पडायचं नाही असा सल्ला उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या आमदारांना दिल्या.
उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेट
विधान परिषदेचे आमदार असलेले उद्धव ठाकरे नागपुरात आहेत. मंगळवारी दुपारी त्यांनी चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात जाऊन त्यांची भेट घेतली. एक पुष्पगुच्छ देऊन उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचं अभिनंदन केलं. यावेळी दोघांमध्ये चर्चाही झाली. या भेटीवेळी त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, सचिन अहिर आणि वरुण सरदेसाई उपस्थित होते.
या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी जी दुसरी भेट घेतली ती जास्त लक्षवेधी आहे. आमदार अपात्रतेप्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात ज्यांनी निकाल दिला, त्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांची उद्धव ठाकरे यांनी स्वत: जाऊन भेट घेतली. ठाकरेंची शिवसेना सध्या विरोधी पक्षनेपद मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी करतेय. त्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना महत्त्व आहे.
अचानक शंभुराज देसाई आले
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राहुल नार्वेकरांची चर्चा सुरु असताना अचानक कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई तिथे दाखल झाल्याचं पाहायला मिळालं. ठाकरेंची साथ सोडून शिंदेंसोबत गेलेले शंभूराज देसाई आणि ठाकरेंमध्ये यावेळी संवाद झाला का हे मात्र समजू शकलं नाही. ही भेट ठरवून होती की योगायोग हे पाहणं महत्त्वाचं असेल. मात्र भेटीच्या या घडामोडींमुळे चर्चांना उधाण आलंय.
ही बातमी वाचा: