सातारा : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपप्रवेशावरुन गेले काही दिवस राज्यात तसेच दिल्लीतील भाजपमध्ये खलबतं सुरु होती. उदयनराजेंना भाजप पक्षश्रेष्ठी पक्षात घेऊ इच्छित नसल्याची चर्चादेखील रंगली. परंतु या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. उदयनराजे उद्या (14 सप्टेंबर) नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः उदयनराजेंनी ट्विटरद्वारे दिली आहे.

उदयनराजे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय रस्ते व हवाई वाहतूकमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे महाराष्ट्र पदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत पक्षप्रवेश करणार आहेत.

उदयनराजेंनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील.

शरद पवारांचा आशिर्वाद घेऊनच उदयनराजेंनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. दरम्यान, उदयनराजे भोसले भाजपमध्ये येतील. परवा मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी आणखी थोडा वेळ मागितला होता, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते यावेत असं मला वाटतं. त्यांनी यावं अशी गणपतीच्या चरणी प्रार्थना, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेश प्रत्येक मेगाभरतीमध्ये पुढे ढकलला जात होता. उदयनराजे भोसले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात 10 सप्टेंबर रोजी 'वर्षा' बंगल्यावर दीड तास चर्चा झाली होती. सगळ्या घडामोडींनंतर अखेर खासदार उदयनराजे भोसले यांचा प्रवेश निश्चित झाला आहे.

व्हिडीओ पाहा



राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मनधरणी करण्याचा प्रयत्न
खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु उदयनराजेंनी कोणताही निर्णय जाहीर केला नव्हता. त्यानंतर पुण्यात उदयनराजेंची जवळच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक झाली होती. यात देखील कार्यकर्त्यांनी त्यांना भाजपमध्ये न झाल्याचा सल्ला दिला होता. तर दुसरीकडे उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा न दिल्याने त्यांना पक्षात घेण्यासाठी भाजपमधले काही नेते अनुत्सुक असल्याची चर्चा होती.

संबंधित बातम्या