सातारा : गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आऊटगोईंग अजूनही सुरुच आहे. त्यात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते आणि साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले राष्ट्रवादीला रामराम करुन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.

उदयनराजेंच्या भाजप प्रवेशाबाबत सुरु असलेल्या चर्चेला खुद्द उदयनराजेंनी स्वल्पविराम लावला आहे. आज काही माध्यमांनी उदयनराजेंना भाजप प्रवेशाबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले की, "लोकांचे हित पाहून निर्णय घेईन"

उदयनराजे म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो. साताऱ्यातील विकासकामांबाबत आमची चर्चा झाली. पूर्वी माझी कामं होत नव्हती. परंतु फडणवीस यांनी माझी खूप कामं केली"

भाजपमध्ये तुमचे जवळचे लोक आहेत, त्यामुळे तुमच्या भाजप प्रवेशाची संपूर्ण साताऱ्यात चर्चा सुरु आहे का? असा प्रश्न उदयनराजेंना विचारण्यात आला. यावर उदयनराजे म्हणाले की, "प्रत्येक पक्षात माझे जवळचे संबंध असलेले नेते आहेत. त्याचा अर्थ असा नाही की, मी त्यांच्या पक्षात जाईन"

उदयनराजे म्हणाले की, "मी माझ्या मनाला वाटेल तेव्हा आणि मनाला पटतील ते निर्णय मी घेत असतो. यापुढेही मी जनतेच्या हिताचा विचार करुन निर्णय घेईन"

पाहा काय म्हणाले उदयनराजे?



 उदयनराजे मुख्यमंत्र्याच्या भेटीला, भाजपप्रवेशाची चर्चा | एबीपी माझा