प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे: उदयनराजे भोसले
एबीपी माझा वेब टीम | 22 Jun 2016 02:53 AM (IST)
सातारा: वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी राज्यात 2 कोटी वृक्ष लागवडीचा चंग बांधला असताना, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही प्रत्येकानं एक झाड लावलं पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढत असून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवडीवर भर देण्याची गरज असल्याचं उदयनराजेंनी म्हटलं आहे. याचबरोबर प्रत्येक नविन गाडीचे पासिंग करतान वाहनधारकाकडून पर्यावरणासाठी आणि झाडे लावण्यासाठी त्याला प्रवृत्त केले पाहिजे. अस मत उदयनराजेंनी व्यक्त केलं. ग्लोबल वॉर्मिंगचा आपण आता गांभीर्यानं विचार करायला हवा. जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर या पृथ्वीतलावर एकही जीव आपल्याला दिसणार नाही. अशी चिंता उदयनराजेंनी व्यक्त केली. पृथ्वीवरील समतोल सध्या बिघडलेलाच आहे. त्यामुळे हा समतोल पुन्हा साधणं महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र शासनानं दोन कोटी झाडं लावण्याचा जो निर्णय घेतला आहे तो चांगला आहे. पण आतापर्यंत याकडे का लक्ष दिलं गेलं नाही? असाही सवाल उदयनराजेंनी विचारला.