नागपूर : राज्याची उपराजधानी नागपुरात एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांची हत्या करण्यात आली आहे. एका घटनेमागे अवैध दारू विक्रीचा वाद, तर दुसऱ्या घटनेमागे जुनं वैमनस्य कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागपुरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
पहिली घटना वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत वडधामना परिसरात काल संध्याकाळी घडली. अजय रामटेके या 28 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आली. अजयला त्याच्याच मित्रांनी नागपूर-अमरावती महामार्गापासून हाकेच्या अंतरावर एका निर्जन ठिकाणी धारदार शस्त्रांनी जीवे मारलं.
अजय रामटेके आणि त्याचा मित्र राहुल वंजारी दोघे खानावळ चालवायचे. त्याच ठिकाणी दोघे अवैधरित्या ग्राहकांना दारुही उपलब्ध करून द्यायचे. त्याच दारू विक्रीच्या पैशाचा दोघांमध्ये वाद होता. घटनेच्या एक दिवस आधीही दोघांमध्ये वाद झाला होता. मात्र काल संध्याकाळी राहुलने काही अज्ञातांच्या मदतीने अजयचा पाठलाग केला आणि निर्जन ठिकाणी गाठून त्याची हत्या केली. या घटनेत अजून कुणालाही अटक झालेली नाही.
दुसरी घटना जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत मंगळवारी आठवडी बाजारात घडली. समीर उर्फ सोनू शाह नावाच्या 20 वर्षीय युवकाला भर बाजारात तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी जीवे मारलं. समीर शाहचे ऋषभ खापेकर, फय्याज शेख आणि एका अल्पवयीन मुलासोबत जुनं वैमनस्य होतं. त्यामुळे त्यांच्यात गेल्या वर्षीपासून नेहमीच खटके उडायचे.
अनेकदा वाद पोलीस स्टेशनपर्यंतही पोहोचले होते. कधीतरी समीर शाह आपल्यावर हल्ला करून जीवे मारेल, या भीतीने ग्रस्त असलेल्या ऋषभ खापेकर, फय्याज शेख आणि अल्पवयीन मुलाने काल रात्री बाजारातच समीर शाहची हत्या केली. या प्रकरणात पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
एकाच रात्रीत दोन हत्या, नागपुरात कायदा-सुव्यवस्थेचे तीन तेरा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Nov 2017 02:48 PM (IST)
पहिली घटना वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत वडधामना परिसरात काल संध्याकाळी घडली. तर जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत मंगळवारी आठवडी बाजारात दुसरी घटना घडली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -