यवतमाळ : शिवसेना महिला आघाडीच्या विद्यमान जिल्हा संघटिका लता चंदेल यांना दोन महिन्याचा सश्रम तुरुंगवास ठोठावण्यात आला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी यवतमाळ सत्र न्यायालयाने चंदेल यांना शिक्षा सुनावली.
13 डिसेंबर 2013 रोजी शहर उपविभागीय कार्यालयामध्ये शिवसेना कार्यकर्ते आणि नगरसेवक भारनियमनावर चर्चा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका लता चंदेल उपस्थित होत्या.
यवतमाळमधील भोसा भागातील भारनियमनाला सहअभियंता श्रीराम साठे हे जबाबदार आहेत, असा आरोप करुन लता चंदेल यांनी पायातील चप्पल काढून साठे यांना मारहाण केली होती.
या मारहाण प्रकरणी वडगाव रोड पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण न्याय प्रविष्ट झाल्यानंतर या प्रकरणात 6 साक्षी तपासण्यात आल्या. गुन्हा सिद्ध झाल्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन महिने सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.