औरंगाबाद मनपात एमआयएम नगरसेवकांची राडेबाजी
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 16 Oct 2017 05:20 PM (IST)
औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या नगरसेवकांनी जोरदार राडेबाजी केली. गोंधळ घालणाऱ्या दोन नगरसेवकांचं पद कायमचं रद्द करण्यात आलं आहे.
औरंगाबाद : पाणीप्रश्नाच्या मुद्द्यावरुन औरंगाबाद महापालिकेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. गोंधळ मिटवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षा रक्षकाला एमआयएमच्या नगरसेवकांनी मारहाण केली. गोंधळ घालणाऱ्या दोन नगरसेवकांचं पद कायमस्वरुपी रद्द करण्यात आलं आहे. औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर भगवान घडामोडे यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यांची शेवटची सर्वसाधारण सभा होती. औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्नावर सर्वपक्षीय नगरसेवक जाब विचारत होते. नियमित पाणी पुरवठा करण्याचीही मागणी करण्यात आली. त्यानंतर या सर्व गोंधळाला सुरुवात झाली. महापौरांनाही खुर्ची लागली जेवढी पाणीपट्टी वसूल केली जाते, त्याच पद्धतीने पाणीही पुरवलं जावं, असं शिवसेनेने सूचित केलं. यावर एमआयएमकडून आक्षेप घेण्यात आला. शिवसेना आणि एमआयएमच्या नगरसेवकांमध्ये बाचाबाची झाली. याचवेळी एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांनी खुर्च्या फेकायला सुरूवात केली. हा प्रकार पाहून महापौर सुरक्षा रक्षकांच्या जवळ गेले तेव्हा एक खुर्ची त्यांच्या डोक्यावर पडली. या प्रकारानंतर सय्यद मतीन आणि जफर बिल्डर या दोघांचे नगरसेवक कायमचे रद्द करण्यात आले. हे दोघेही राजदंड पळवण्यासाठी पुढे सरसावले होते. 'वंदे मातरम्'च्या मुद्द्यावरुनही याच नगरसेवकांचा राडा याआधी ‘वंदे मातरम’च्या मुद्द्यावरून महापालिकेत राडा झाला होता. त्या राड्यातही याच दोन नगरसेवकांचा पुढाकार होता. सोमवारी झालेल्या राड्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी या दोघांना सभागृहाच्या बाहेर काढलं आणि कामकाज पुन्हा सुरू करण्यात आलं. पाहा व्हिडिओ :