कोल्हापूर : कोल्हापुरातील सराफांची गल्ली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरी येथे चोरटयांनी पहाटेच्या सुमारास दोन दुकानांवर डल्ला मारला आहे. पहाटे कोल्हापूरकर गाड झोपेत असल्याचा फायदा घेत चोरटयांनी चार चाकी मधून येऊन दोन दुकानांमध्ये चोरी केली आहे. गुजरी येथील संतोष शेळके यांचे दुकान आणि अंबाबाई मंदिराजवळचे कोलेकर ज्वेलर्स ही दोन दुकानं फोडून चोरट्यांनी साडेनऊ किलो चांदी आणि 58 तोळे (580 ग्रॅम)सोने लंपास केले आहे. कोलेकर ज्वेलर्स हे अंबाबाई मंदिरापासून अगदी जवळ आहे. प्रमोद कोलेकर हे या दुकानाचे मालक आहेत. त्यांनी काल रात्री ८ वाजता दुकान बंद केले आणि ते घरी गेले. रात्री चोरांनी कुलुपाची पट्टी कापून चांदी आणि सोन्याचे दागिने लंपास केल्याचे समोर आले आहे. या ज्वेलर्समधील 4 ते 5 किलो चांदी आणि 500 ग्रॅम (50 तोळे)सोने चोरांनी पळवले आहे. तसेच चोरांनी संपूर्ण तिजोरी लंपास केली आहे. संतोष शेळके यांचे गुजरी येथे सराफाचे दुकान आहे. आज सकाळी त्यांचे कर्मचारी नेहमीप्रमाणे दुकान उघडायला गेले असता त्यांना दुकानाच्या दोन्ही कुलुपांच्या पट्ट्या कापल्या असल्याचे दिसले. त्या नंतर त्यांनी लगेच मालकाला फोन करून कळवले असता संतोष शेळके तिथे आले. आपले दुकान लुटल्याचे समजल्यावर शेळके यांनी जुना राजवाडा येथे जाऊन पोलिसांत तक्रार दाखल केली तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी दुकानात असणारे cctv तपासले असता त्यांना त्यामध्ये एक चोरटा जॅकेट घालून, तोंडाला रुमाल बांधून दुकानात घुसलेला दिसला. या चोराने दुकानातील सर्व सोन्याचे आणि चांदीचे दागिने घेऊन तिथून पळ काढला. हा चोर चोरीचा माल पळवून नेण्यासाठी काहीही घेऊन आला नव्हता, त्यामुळे त्याने दुकानात पाण्याने भरून ठेवलेली बादली या कामासाठी वापरली. त्याने दुकानातील साडेचार किलो चांदी आणि आठ तोळे सोने (80 ग्रॅम)लंपास केले आहे.