नागपूर : हिवाळी अधिवेशन सुरु असताना मुख्यमंत्र्यांवर नामुष्की ओढवणारी आणखी एक घटना आज (मंगळवार) पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. खरबी चौकाजवळच्या लक्ष्मी फॅमिली रेस्टॉरंटजवळ दोन कुख्यात गुंडांची हत्या करण्यात आली आहे. बादल शंभरकर आणि संजय बानोदे अशी या दोघांची नावं आहेत. तर तिसरा राजेश यादव गंभीर जखमी आहे.
नागपुरातला तडीपार गुंड संजय बनोदे आणि फरार गुंड बादल शंभरकर या दोघांना प्रतिस्पर्धी मेश्राम टोळीच्या गुंडांनी पाठलाग करुन संपवलं. आधी मोटरसायकलला स्विफ्ट कारने उडवलं आणि नंतर दोघांची निर्घृण हत्या केली.
तडीपार आणि फरार असलेले गुंड नागपुरात नेमकं काय करत होते? ते नागपूर पोलिसांना का सापडले नाहीत? पोलिसांकडे या प्रश्नांची तर उत्तरे नाहीतच. पण हिवाळी अधिवेशन सुरु असताना आणि पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना नागपुरात सुरु असलेल्या हत्याकांडांबद्दलही पोलिसांकडे काहीच उत्तर नाही.
याच मुद्यावर आज विधानसभेतही आवाज उठवण्यात आला. पण राज्याच्या गृहमंत्र्यांनी मात्र पोलिसांना पाठीशी घातलं. आकडे, टक्केवारी आणि सरासरी सांगून नागपूरचा क्राईम रेट कमी होणार नाही. त्यासाठी गृहमंत्र्यांना त्यांच्या खात्यावर आणखी लक्ष द्यावं लागेल. अन्यथा क्राईम सिटीच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेलं नागपूर पहिल्या क्रमांकावर येण्यास वेळ लागणार नाही.