अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात एक आगळा वेगळा विवाह सोहळा पार पडला. अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊनचे सर्व निर्बंध नुकतेच शिथिल करण्यात आले आहेत. त्यानंतर पारनेर तालुक्यातील दोन जोडप्यांनी चक्क कोविड सेंटरमध्येच लग्न केले आहे. लग्नात होणारा अवांतर खर्च टाळून या जोडप्यांनी कोविड सेंटरला मदत केली आहे. 

Continues below advertisement

हौशी जोडप्यांनी विविध ठिकाणी विविध प्रकारे लग्न केल्याचे आपण पाहिले आहे. असाच एक विवाह सोहळा अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील कोविड सेंटरमध्ये पार पडला. पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या शरद पवार आरोग्य मंदिर या कोविड सेंटरमध्येच दोन जोडप्यांनी लग्न केले आहे. अनिकेत सखाराम व्यवहारे व आरती नानाभाऊ शिंदे तसेच राजश्री काळे व जनार्दन पुंजाजी कदम यांनी आपल्या नवीन वैवाहिक जीवनाची सुरुवात कोविड सेंटरममधून केली आहे. 

विवाह म्हटलं तर मोठा खर्च हा येतोच. या अवांतर खर्चाला आळा घालून ती रक्कम कोरोना रुग्णांच्या कामी यावी या सामाजिक जाणिवेतून या दोन्ही नव वधू-वरांनी संपूर्ण रुग्णांसाठी मास्क, सॅनिटायझर, पीपीई कीट, अत्यावश्यक औषधे या सेंटरला दिले आहे. इतकेच नाही तर 37000 रुपयांची आर्थिक मदत देखील केली आहे. कोरोना रुग्णांना आपले नातेवाईक, हितचिंतक, वऱ्हाडी आहे, असे समजून भोजनही दिले.

Continues below advertisement

अहमदनगर जिल्ह्यातल्या या अनोख्या विवाह बंधनात अडकणाऱ्या नवदाम्पत्यांनी चांगला निर्णय घेत शासनाच्या सर्व अटी व नियमांचे पालन करत कोरोना तपासणी करून घेत एक अनोखे शुभ मंगल कार्य कोविड सेंटरमध्ये पार पाडले. कोरोना रुग्णांचा आशीर्वाद घेत नवीन वैवाहिक जीवनास या नव दाम्पत्याने सुरुवात केली.