चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात काल झालेल्या राजू यादव यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपींना गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार कोळसा वाहतुकीच्या व्यावसायिक स्पर्धेतून ही हत्या करण्यात आली आहे.


रविवारी संध्याकाळी राजुरा शहरात 45 वर्षीय राजू यादव या कोळसा वाहतूक करणाऱ्या व्यावसायीकाची हत्या झाली. UP किंवा बिहार मध्ये आरोपी एखादा खून करतात त्याप्रमाणे दोन आरोपी सलूनमध्ये शिरले आणि त्यांनी देशी कट्ट्यातून राजू यादव यांच्यावर चार राउंड फायर केले. राजुरा पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि अवघ्या काही तासात चंदन सिंग ठाकूर आणि सत्येंद्र सिंग नावाच्या दोन कोळसा वाहतूक व्यावसायिकांना अटक केली.


चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय नेते आणि प्रशासनाच्या आशीर्वादाने गेल्या काही वर्षात दारू-कोळसा आणि वाळू तस्करी करणारे माफिया तयार झाले आहेत. व्यावसायिक प्रतिस्पर्धेतून हे माफिया कोणाचाही खून करायला मागेपुढे पाहत नाही. मग तो छत्रपती चिडे यांच्या सारखा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असो किंवा प्रतिस्पर्धी टोळीतील गुंड... ऑगस्ट महिन्यात सुरज बहुरिया या कोळसा व्यावसायिकाची अशाच प्रकारे बल्लारपूर शहरात दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. राजू यादव यांच्या खुनामागे देखील कोळसा वाहतुकीतील स्पर्धा कारणीभूत असल्याचा प्राथमिक कयास पोलिसांनी बांधलाय.


पोलिसांनी आरोपींकडून 9 एम एम पिस्तूल सारख्या देशी बनावटीचा कट्टा जप्त केलाय. सोबतच या हत्याकांडात अन्य काही लोकांचा सहभाग आहे का याचा देखील तपास पोलिस करत आहेत. मात्र राजू यादव यांच्या खुनामुळे पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था किती वेशीला टांगली आहे याचा प्रत्यय आलाय.