मुंबई : सोशल मीडियावरुन विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केल्याचं नवीन नाही. मात्र भाजपच्याच अधिकृत ट्विटर हँडलवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निर्णयावर टीका करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.


''राज्यात दोन लाख कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना फडणवीस सरकार 30 टक्के कर्मचाऱ्यांची कपात करायला निघालंय. मेक इन महाराष्ट्र आहे का फुल इन महाराष्ट्र?'' असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.



विशेष म्हणजे या ट्वीटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना टॅगही करण्यात आलं आहे.

3 डिसेंबर रोजी सकाळी सव्वा दहा वाजता हे ट्वीट करण्यात आलं. भाजप सोशल मीडिया सेलच्या हा प्रकार लक्षात येताच हे ट्वीट डिलीट केलं. मात्र तोपर्यंत या ट्वीटचा स्क्रीनशॉट सगळीकडे व्हायरल झाला होता. त्यामुळे सरकारला ट्रोल करण्याची आयती संधी नेटिझन्सला मिळाली.

दरम्यान हा प्रकार कसा झाला, याबाबत भाजप सोशल मीडिया सेलकडून काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.