मुंबई : मुंबईत एका महिलेच्या पोटातून तब्बल 10 किलोचा फायब्रॉईडचा गोळा बाहेर काढण्यात आला आहे. कामा रुग्णालयात महिलेवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करुन हा गोळा बाहेर काढण्यात आला आहे.
या महिलेला गेल्या काही महिन्यांपासून पोटदुखीचा त्रास होत होता. अॅसिडिटीमुळे पोटदुखी असेल म्हणून डॉक्टरांनी औषधोपचार केले, पण पोटदुखी न थांबल्याने महिलेने विविध चाचण्या करुन घेतल्या. महिलेने सोनोग्राफी आणि एमआयआर चाचण्या केल्यानंतर तिच्या पोटात फायब्रॉईडचा गोळा असल्याचं निष्पन्न झालं. या गोळ्यामुळे महिलेच्या मूत्रपिंडावरही दबाव आला होता. गर्भाशयाजवळ असलेल्या या गोळ्याचं निदान होताच तो काढण्यात आला.
महिलेच्या पोटातील हा फायब्रॉईडचा गोळा पोटात पसरल्यानं पोटदुखीचा त्रास होत होता. अडीच तासांच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर हा गोळा बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आलं आहे.