मोठी बातमी: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, तुळजाभवानी मंदिराचे 13 पुजारी पेडलर? आतापर्यंतचा घटनाक्रम पहा
Tuljapur Drug Case: आतापर्यंत या प्रकरणात 35 आरोपी निष्पन्न झाले असून, 21 आरोपी अजूनही फरार आहेत. आतापर्यंत या प्रकरणात काय काय झाले? वाचा

Tuljapur Drug: तुळजापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करीची मोठी चर्चा आहे. या प्रकरणात गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या कारवाया होत आहेत. ड्रग्ज प्रकरणात काही दिवसांपूर्वी राजकीय कनेक्शनही समोर आले होते. या प्रकरणात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पूजाऱ्यांचा ड्रग्ज तस्करीशी संबंध झाल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तुळजापूर ड्रग प्रकरणात बहुतांश पुजारी पेडलर असल्याची सूत्रांची माहिती आहे. (Tuljapur Drug Case) मंदिर प्रशासनाने या आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली आहे. पुजारी मंडळाने मात्र सरसकट पुजाऱ्यांची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले आहे, कारण यातील आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेत सहभागी नव्हते. आतापर्यंत या प्रकरणात 35 आरोपी निष्पन्न झाले असून, 21 आरोपी अजूनही फरार आहेत. यातील 13 आरोपी पुजारी असून मंदिरातील दररोजच्या पुज्याऱ्यांचा याच्याशी काही संबंध नसल्याची भूमिका पुजारी मंडळाने घेतलीय. (tuljapur News)
राजकीय कनेक्शन
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणाचं राजकीय कनेक्शन काही दिवसांपूर्वी समोर आले होते.तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपी सोबतचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.तुळजापूर उबाठा गटाचे कार्यकर्ते राहुल परमेश्वर व सुमित शिंदे तुळजापूर ड्रग्स तस्करी प्रकरणातील आरोपी असून दोन्ही आरोपी सोबत खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो समोर आले. यातील विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे , भाजपशी संबंधित असून चंद्रकांत उर्फ बापू कने, तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष, भाजपशी संबंधित , मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा प्रचार केला होता.विनोद उर्फ पिटू गंगणे, माजी नगराध्यक्षाचे पती, भाजपशी संबंधित असल्याचं समोर येत आहे. (Dharashiv News)
तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचा घटनाक्रम:
- 15 फेब्रुवारी 2025: तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी ड्रग्सचा साठा जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी 2.5 लाख रुपये किमतीचे 59 पुड्या ड्रग्स जप्त केले आणि काही आरोपींना अटक केली.
- फेब्रुवारी 2025 अखेर: तपासादरम्यान, ड्रग्स विक्रीचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी मुंबईतून संगीता गोळे या महिलेला अटक केली, जी या ड्रग्स तस्करीतील मुख्य सूत्रधार असल्याचे मानले जाते.
- मार्च 2025: पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही आरोपींना अटक केली, ज्यात स्वराज उर्फ पिनू तेलंग, वैभव गोळे आणि संतोष खोत यांचा समावेश आहे. तपासात असेही समोर आले की आरोपी संगीता गोळेच्या बँक खात्यावरून सुमारे 5 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत आणि तिच्याकडून काही प्रमाणात सोने देखील जप्त करण्यात आले.
- मार्च 2025: पोलिसांनी फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू ठेवला आणि त्यापैकी काही जणांना अटक करण्यात यश आले. या दरम्यान, तपासाची व्याप्ती वाढत गेली आणि आणखी 10 आरोपींची नावे समोर आली, ज्यामुळे फरार आरोपींची संख्या 21 वर पोहोचली.
- मार्च 2025: तपासात राजकीय कार्यकर्त्यांचा सहभाग आणि माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर झाल्याचे समोर आले, ज्यामुळे या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले.
-
एप्रिल 2025: या प्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती समोर आली, ज्यात तुळजाभवानी मंदिरातील तब्बल 13 पुजाऱ्यांचा ड्रग्स तस्करीमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले. या पुजाऱ्यांचा राजकीय पक्षांशी संबंध असल्याची माहितीही समोर येत आहे. मंदिर प्रशासनाने या आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांकडून मागवली आहे. पुजारी मंडळाने मात्र सरसकट पुजाऱ्यांची बदनामी थांबवण्याचे आवाहन केले आहे, कारण यातील आरोपी पुजारी देवीच्या दैनंदिन पूजेत सहभागी नव्हते.
थोडक्यात काय काय झालं?
- फेब्रुवारी 2025 मध्ये तामलवाडी येथे ड्रग्सचा साठा जप्त, काही आरोपी अटक.
- मुंबई कनेक्शन उघड, मुख्य सूत्रधार महिलेसह आणखी काही जणांना अटक.
- आरोपींच्या बँक खात्यावर कोट्यवधींचे व्यवहार आणि सोने जप्त.
- फरार आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू, आणखी आरोपींची नावे समोर.
- राजकीय कनेक्शन आणि माजी नगराध्यक्षांच्या गाडीचा वापर उघड.
- तुळजाभवानी मंदिरातील 13 पुजाऱ्यांचा सहभाग उघड, मंदिर प्रशासनाकडून कारवाईची तयारी.
- आतापर्यंत 35 आरोपी निष्पन्न, 21 फरार.
हेही वाचा:























