कोल्हापूर : कोल्हापुरात दुचाकीवरुन जाणाऱ्या वाहतूक पोलिसाने पादचाऱ्याला उडवल्याची घटना रात्री उशिरा घडली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर वाहतूक पोलिसाच्या डोळ्याला किरकोळ दुखापत झाली आहे.
इंद्र सिक्युरिटीमध्ये कामगार असणारे सर्जेराव हणमंत संगपाळ हे ड्युटीसाठी उद्यम नगर इथे चालले होते, तर जनता बाजार चौकात ड्युटीवर असणारे वाहतूक पोलिस विजय मालोजीराव खोत हे ड्युटीवरुन हजेरीसाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडे आपल्या दुचाकीवरून चालले होते. यावेळी बागल चौकातील आयसीआयसी बँकेच्या परिसरात वाहतूक पोलिस विजय खोत याच्या भरधाव दुचाकीने रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी सर्जेराव संगपाळ याना उडवले.
दुचाकीची धडक जोरात बसून संगपाळ याचं डोकं रस्त्याच्या दुभाजकाला जोराने आदळलं आणि डोक्यातून रक्तस्त्राव सुरु झाला.
या अपघातात सर्जेराव संगपाळ हे गंभीर जखमी झाले आहे. अपघाताला कारणीभूत असणारे वाहतूक पोलिस विजय खोत हे किरकोळ जखमी झाले आहेत. या दोघांवर कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान अपघातात गंभीर जखमी झालेल्या सर्जेराव संगपाळ यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सीपीआरच्या डॉक्टरांनी सांगितलं.