सिंधुदुर्ग : भरतीच्या काळात समुद्र किनाऱ्यावर जाऊ नका असं कितीही वेळा सांगितलं तरी अतिउत्साही पर्यटक कुणाचं ऐकत नाहीत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण रॉक गार्डनच्या बाजूला समुद्र किनाऱ्यावरील अतिउत्साही पर्यटकांचा असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.


समुद्रातून मोठमोठ्या लाटा येत असतानाही हे पर्यटक किनाऱ्यावर बसून लाटांचा आनंद घेत आहेत. हे धाडस या पर्यटकांच्या जीवावरही बेतू शकतं. मात्र त्याची कोणतीही चिंता न करता हे पर्यटक समुद्र किनाऱ्यावर लाटांचा आनंद घेत आहेत.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हे पर्यटक कोण आहेत आणि ते कुठून आले आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. या पर्यटकांना या ठिकाणाहून सुखरुपपणे बाहेर येण्यात यश आलं.



पावसाळा सुरु झाल्यापासून समुद्रात बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र अतिउत्साही पर्यटक यातून कोणताही धडा घेत नाहीत.

मान्सूनसाठी महाराष्ट्राचं प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्गात आज पावसाने उसंत घेतलेली असली, तरी अधूनमधून येणाऱ्या मुसळधार सरींमुळे जिल्ह्यात पाणीपाणी झालं आहे. विशेषतः आंबोली हिल स्टेशनवर कोसळणाऱ्या पावसामुळे पश्चिम वाहिनी नद्या प्रवाही झाल्या आहेत. आंबोलीतल्या पावसाने पर्यटकांचीही पावले वळू लागली आहेत.

मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, देवगड आणि वैभववाडी या तालुक्यांमध्ये भरपूर पाऊस झाला आहे. सावंतवाडी आणि कणकवली तालुक्यात काही घरांवर झाड कोसळून नुकसानही झालं आहे.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील तिघे अलिबागच्या समुद्रात बुडाले


मुंबईतल्या पाच पर्यटकांचा रत्नागिरीच्या समुद्रात बुडून मृत्यू