Todays Headline 29 November : शिवप्रताप दिन उत्सवाच्या निमित्ताने 29 आणि 30 नोव्हेंबर असे दोन दिवस विविध कार्यक्रम प्रतापगडावर होणार आहेत.  आज दुपारनंतर मुख्यमंत्री मुक्कामी महाबळेश्वर मध्ये येणार आहेत.  त्याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. याबरोबरच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यासह दिवसभरात नियोजित असलेल्या महत्वाच्या राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्री आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडीचा आढावा घेणार आहोत.. पाहूयात आज दिवसभरात कोणत्या महत्वाच्या घडामोडी घडणार आहेत..  


साताऱ्यात शिवप्रताप दिन विशेष कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार 


शिवप्रताप दिन उत्सवाच्या निमित्ताने 29 आणि 30 नोव्हेंबर असे दोन दिवस विविध कार्यक्रम प्रतापगडावर होणार आहेत.  आज दुपारनंतर मुख्यमंत्री मुक्कामी महाबळेश्वर मध्ये येणार आहेत. तर 30 तारखेला ते गडावर स्वतः हजर राहून छत्रपती शिवरायांच्या नावाचा झेंडा बुरुजावर झळकवणार आहेत.   


राज ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर  


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दुपारी  पुण्याहून कोल्हापूरला पोहचतील.  पंढरपूरातील माऊली कॉरिडॉरला विरोध करणारे सर्व पक्षीय शिष्टमंडळ कोल्हापूर विश्रामगृह येथे राज ठाकरे यांना भेटणार आहेत. 


पुण्यातील रिक्षा संघटना राज ठाकरेंची भेट घेणार
 पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनातील रिक्षा संघटनांची कृती समिती राज ठाकरेंची भेट घेणार आहे. 
 
 जेजुरीच्या खंडेरायाची चंपाषष्ठी यात्रा
महाराष्ट्राचे लोकदैवत म्हणजे जेजुरीचा खंडेराय. खंडेरायाच्या वर्षभर विविध यात्रा पार पडतात. मात्र विजयाचं महाप्रतिक असणाऱ्या चंपाषष्टी यात्रेला राज्यभर वेगेळे स्थान आहे. खंडेरायाच्या  जेजुरी गडावर सहा दिवस घट स्थापन करून साजऱ्या होणाऱ्या चंपाषष्ठी यात्रेची आज वांग्याचे भरीत आणि रोडग्याचा नैवद्य देवाला दाखवून  घट उठवून सांगता होणार आहे. मोठ्या संख्येने भाविक जेजुरीत दाखल होत असतात. जेजुरीच्या प्रत्येक घरातील लोक हा नेवैद्य घेऊन जातात.  
 
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीनावर हायकोर्टात सुनावणी होणार आहे. देशमुखांनी सीबीआय केसमध्ये जीमानासाठी अर्ज दाखल केलाय.  
 
 नांदेडमध्ये  लव्ह जिहाद विरोधात जिल्ह्यात हिंदू संघटना रस्त्यावर उतरणार


देशातील वाढत्या लव्ह जिहाद प्रकरणा संदर्भात सरकारने कडक कायदे करून कठोर भूमिका घ्यावी व नांदेड येथील स्वप्नील नागेश्वर या तरुणाचा प्रेम संबंधांतून विशिष्ट समुहातील टोळक्याने केलेल्या हत्येच्या निषेधार्थ, विश्वाहिंदू परिषद, बजरंग दल,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हाधिकारी कार्यालयावर दुपारी १ वाजता रॅली काढणार आहेत. 


 अमरावतीत राष्ट्रीय संत संमेलन


 अचलपूर येथे आजपासून 8 डिसेंबर पर्यंत एकादश कुंडात्मक श्रीराम महायज्ञ आणि श्रीराम कथा आणि राष्ट्रीय संत संमेलन होत आहे. यावेळी देशभरातून जवळपास 500 साधुसंत येणार आहेत. अचलपूर येथील बालाजीपूरम चांदूरबाजार रासेगाव रोड सुलतानपूरा येथे 29 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत आचार्य सुदर्शनजी महाराज वृंदावन यांचे मार्गदर्शनाखाली सकाळी 6 ते 8 एकादश कुंडात्मक श्रीराम महायज्ञ आणि दुपारी 2 ते 6 आंतरराष्ट्रीय श्रीराम कथा प्रवक्त्या श्री श्री १००८ श्रीमहंत श्रीराम मोहनदासजी रामायणी महाराज हिमाचल प्रदेश यांच्या दिव्य वाणीतून श्रीराम कथेला प्रारंभ होणार आहे.