मुंबई : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..



लालबाग, परळमधून उपनगरांत गणेशमूर्ती रवाना होणार


सार्वजनिक गणेशोत्सवाकरता मोठ्या संख्येनं गणेशमूर्ती लालबाग, परळमधून उपनगरांत रवाना होतील. विलेपार्ले, अंधेरी, चिंचपोकळी येथील अनेक मानाच्या गणेशमूर्तींचे प्रथम दर्शन घेण्यास आज मोठ्या संख्येनं लालबाग परळमध्ये गर्दी उसळणार आहे. 


 मेट्रो कारशेडचं आरे जंगलातील काम थांबवावं यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन


मेट्रो कारशेडचं आरे जंगलात सुरु असलेलं काम थांबवावे यासाठी आता राजकीय पक्ष मैदानात उतरत आक्रमक भूमिका घेत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील लुईसवाडीतील घरासमोर आज आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी पर्यावरणप्रेमींसोबतच काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आंदोलनासाठी दाखल होण्याची शक्यता आहे. 


अखील भारतीय छावा संघटना व शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मरीन ड्राईव्ह चौपाटी येथे समाधी घेण्याचा इशारा


मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अखील भारतीय छावा संघटना व शिवसंग्राम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मरीन ड्राईव्ह चौपाटी येथे आज समाधी घेण्याचा इशारा दिला आहे. आंदोलकांची अण्णासाहेब अर्थिक विकास महामंडळाला निधी मिळावा. जो पर्यंत आरक्षण मिळतं नाही तोपर्यंत विद्यार्थांना शिक्षणात आर्थिक सूट मिळावी अशी मागणी आहे. 


 उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद


 उद्योग मंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद होणार आहे. ही पत्रकार परिषद एमसीए, बीकेसी येथे आज दुपारी साडेबारा वाजता होईल.  
 
भारत पाक बॉर्डरचा राजा निघाला काश्मीरला
भारत आणि पाक च्या सीमेवर पुंछ येथे विराजमान होणाऱ्या भारत पाकच्या राजाची मूर्ती आज विद्याविहार येथून काश्मीर रवाना होणार आहे. अजूनही काश्मीरमध्ये तणावाची स्थिती असताना हा गणपती अगदी पाकिस्तान लगत विराजमान होतो आहे. मोठा खडतर प्रवास करून हा बाप्पा पुंछला पोहचतो आणि तिथे स्थानिक नागरिक आणि भारतीय सैन्य त्याची मनोभावे दहा दिवस पूजा करतात. 


मुंबई हाफ मॅरेथॉन


माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आज मुंबई हाफ मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवणार आहे. हाफ मॅरेथॉन जिओ गार्डन, बीकेसी येथे सुरू होईल. 


दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणातील आरोपींची चौकशी


दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणातील आरोपींची सीबीआयने शनिवारी चौकशी सुरू केली आणि दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणी दरम्यान भ्रष्टाचाराच्या कथित प्रकरणात तीन आरोपींचे जबाब नोंदवले. सीबीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली अबकारी घोटाळ्यातील आरोपींची चौकशी शनिवारी उशिरा संपली. मनीष सिसोदिया यांच्या कथित निकटवर्तीयांची ही चौकशी करण्यात आली. लेखी जबाब नोंदवून लवकरच इतर आरोपींना समन्स बजावण्यात येईल. एजन्सी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह 31 ठिकाणी छापे टाकल्यानंतर जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांची चौकशी करत आहे.