मुंबई : हिंगोली लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भाजपच्या दबावासमोर नामुष्की झाली आहे. पहिल्या यादीमध्ये हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर हिंगोलीमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर आता भाजपच्या दबावामुळे एकनाथ शिंदे यांना हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करावी लागली आहे. हेमंत पाटील यांचा पत्ता कट करून बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून अत्यंत चर्चेचा मुद्दा झालेल्या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून भावना गवळी यांचा सुद्धा पत्ता कट करण्यात आला आहे. या ठिकाणी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे.
हेमंत पाटलांचे तिकीट कापल्यानंतर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी हेमंत पाटलांशी चर्चा केल्याशिवाय असा निर्णय घेणार नाहीत असं ते म्हणाले.
बाबूराव कदम कोहळीकर यांची प्रतिक्रिया
मी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली नव्हती. गेल्या चार दिवसांपासून पक्षाने माझ्याशी संपर्क केला जात होता. हेमंत पाटील हे माझे क्लासमेट आहेत. पक्षाकडून आणि हेमंत पाटील यांनीही मला मुंबईला येण्यास सांगितलं, त्यानंतर मला पेपर-डॉक्युमेंट तयार करण्यास सांगितलं. हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनाही यवतमाळ वाशिममधून तिकीट दिलं आहे. मी शेतकरी कुटुंबातील आहे, शेतकरी पुत्राला एवढी मोठी जबाबदारी दिलीय, मी मुख्यमंत्र्यांचा आणि पक्षाचा आभारी आहे, असं बाबूराव कदम कोहळीकर यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली.
भावना गवळींचा पत्ता कट
भावना गवळी या यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळवण्यासाठी यांनी सर्वस्व पणाला लावले होते. वर्षा बंगल्यावर येऊन मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तसेच फडणवीस यांचीही भेट घेतली होती. फडणवीसांच्या घरी जाण्यापूर्वी भावना गवळी उत्साहात होत्या. परंतु, 25 मिनिटांच्या भेटीनंतर बाहेर पडल्यानंतर भावना गवळी यांचा नूर पूर्णपणे बदलला होता. गवळी यांनी आपली गाडी देवेंद्र फडणवीस यांच्या अंगणात मागवून घेतली आणि तिथूनच त्या गाडीत बसून निघून गेल्या होत्या. तेव्हापासूनच यवतमाळ-वाशीममधून भावना गवळी यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चेने जोर धरला होता.
इतर महत्वाच्या बातम्या