नाशिक : कांद्याच्या घसरलेल्या दरावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. "मंत्र्यांना कांदे फेकून मारा," असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पेठ तालुक्यातील जाहीर सभेत हे वक्तव्य केलं.
"नाशिक दौऱ्यावर असताना अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्यासमोर व्यथा मांडली. एवढी मेहनत करुन तुमच्या पदरी निराशा पडत असेल, सरकार तुम्हाला आश्वासन देण्यास तयार नसेल तर कांदा रस्त्यावर टाकण्याऐवजी मंत्र्यांना फेकून मारा. इतकं सरळसोपं आहे.जो मंत्री दिसेल त्याला कांदा फेकून मारा. इतका कांदा मारा की मंत्री बेशुद्ध पडला पाहिजे. मग तोच कांदा फोडा आणि त्याच्या नाकाला लावा. शुद्धीवर आल्यावर पुन्हा त्याला मारा," असं राज ठाकरे म्हणाले.
"मंत्र्यांना कांदा फेकून मारण्याचं माझं वक्तव्य एवढं पसरलं की ते सरकारपर्यंत पोहोचलं. सरकारने आता कांद्याला 200 रुपयांचा दर जाहीर केला आहे. मात्र कांद्याला दिलेल्या 200 रुपये प्रति क्विंटल अनुदानावर मी समाधानी नाही," असं राज ठाकरेंनी सांगितलं.
मंत्री ऐकत नसल्यास कांदे फेकून मारा : राज ठाकरे
कांद्याला प्रति क्विंटल 200 रुपये अनुदान
दरम्यान, कांद्याला 200 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच परराज्यात वाहतुकीसाठी अनुदान आणि कांद्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन देण्याचा विचार सरकार करत आहे. 1 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत ज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा घातला आहे तेच शेतकरी यासाठी पात्र ठरतील, असं सरकारने म्हटलं आहे.
मदत अत्यंत तोकडी : जयंत पाटील
"ही मदत अत्यंत तोकडी आहे. नाशिक जिल्ह्यातून बाहेर कांदा पाठवतात. राज्य सरकारने बाहेर कांदा पाठवण्यासाठी अनुदान दिलं पाहिजे. कांद्याची किंमत घसरली असताना दोन रुपये अनुदान परवडत नाही. प्रति किलो कांद्याला अनुदान दिलं पाहिजे, शेतकरी कांदा कुठेही विकेल. पण नाशिकहून निघालेला कांदा गुजरात, दिल्ली पोहोचेपर्यंत हे अनुदान कमी होतं," असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे.