मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार हे आजही सगळ्यात ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते आहेत. त्यांचा आशीर्वाद मिळाला की महाराष्ट्रातील राजकारणात तुमची नैय्या पार पडणार. सध्या राज्यातील तीन तरुण नेत्यांचं राजकीय करिअर शरद पवार यांच्या निर्णयावर अवलंबून आहे. केवळ आपल्याच पक्षातील नाही तर इतर पक्षातील तरुण नेत्यांना देखील त्यांचं मार्गदर्शन मिळतं. त्यांनी आपल्या दूरदृष्टीने आजवर अनेकांची राजकीय करिअर घडली आहेत. आजही तीन नवीन तरुण चेहऱ्यांना 2019 लोकसभा निवडणुकीत संधी मिळणार का हे पण पवार 'आजोबां'च्या निर्णयावर अवलंबून आहे.
ही तीन नावं म्हणजे मावळमधून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार, दक्षिण अहमदनगर मधून राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील आणि बुलडाणामधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर.
पवार आजोबांनी मात्र नातवाच्या एंट्रीला ब्रेक मारला?
मावळमधून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मतदारसंघात फिरायला सुरुवात केली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघ निहाय बैठकीत पार्थ पवार यांचं नाव देखील चर्चेत आलं होतं. पण पवार आजोबांनी मात्र नातवाच्या या एंट्रीला ब्रेक मारला.
पहिल्याच बैठकीत पवार घरातील सगळ्यांनी निवडणूक लढवली तर कार्यकर्ते काय करणार? असा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतरही पार्थ पवार यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. प्रसारमाध्यमात चर्चा होत असल्याने पवारांनी ते आणि सुप्रिया सुळे फक्त लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे पार्थ पवारांच्याया उमेदवरीबाबत प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे.
सुजय विखे पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच संघर्ष
दुसरा तरुण चेहरा डॉ. सुजय विखे पाटील. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र आणि बाळासाहेब विखे पाटील यांचे नातू. बाळासाहेब विखे पाटील आणि शरद पवार यांचं वैर साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 1991 मध्ये दक्षिण अहमदनगर जागेच्या निवडणुकीवरून सुरु झालेलं वैर कदाचित अजूनही संपलेलं नाही. कारण दक्षिण नगरच्या जागेबाबत अजून शरद पवार निर्णय घ्यायला तयार नाहीत.
ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे, पण काँग्रेसलाही जागा हवी आहे. डॉ.सुजय विखे पाटील यांनी तयारी देखील केली आहे. मात्र अजूनही राष्ट्रवादी या जागेबाबत निर्णग घ्यायला तयार नाही. त्यामुळे सुजय विखे पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच हा संघर्ष सुरू झाला आहे. आता पवारांच्या निर्णयानंतरच पुढे सुजयला नेमकी निवडणूक कशी लढवायची हा निर्णय घ्यावा लागेल.
रविकांत तुपकरांची बुलडाणा लोकसभा लढवण्याची तयारी
तिसरा युवा नेता म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर. दिल्लीत राजू शेट्टी शेतकऱ्यांच्या विषयावर आक्रमक होत असताना राज्यात पक्षाची धुरा सांभाळणारं तरुण नेतृत्व म्हणजे रविकांत तुपकर. रविकांत तुपकरांनी बुलडाणा लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.
याआधी युतीत असताना महामंडळ मिळूनही रविकांत यांनी शेट्टींच्या बंडानंतर महामंडळ सोडलं. आता लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली तर बुलडाणा जागेची तयारी त्यांनी केली आहे. ही जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे. त्यामुळे पवारांनी बुलढाणा जागा स्वाभिमानीला सोडली तरच याही युवा नेत्याला महाआघाडीकडून निवडणूक लढवायची संधी मिळणार आहे.
राज्यातील अनेक पुतण्यांना या काकांनी आपल्या पंखाखाली घेतलं आहे. आता या मुलांना आजोबा बळ देणार काय? हे देखील काही दिवसात कळेल.
शरद पवारांच्या निर्णयावर 'या' तीन तरुण नेत्यांचं राजकीय करिअर अवलंबून
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Mar 2019 09:08 PM (IST)
आपल्याच पक्षातील नाही तर इतर पक्षातील तरुण नेत्यांना देखील त्यांचं मार्गदर्शन मिळतं. त्यांनी आपल्या दूरदृष्टीने आजवर अनेकांची राजकीय करिअर घडली आहेत. आजही तीन नवीन तरुण चेहऱ्यांना 2019 लोकसभा निवडणुकीत संधी मिळणार का हे पण पवार 'आजोबां'च्या निर्णयावर अवलंबून आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -