एबीपी माझा वृत्तवाहिनीने या धमकीपत्रांबाबतीत पहिल्यांदा आवाज उठवल्यावर संपूर्ण सांगोला परिसरात संतापाची लाट उसळली. खुद्द मुख्यमंत्र्यांकडे गृह विभाग असताना एक माथेफिरु 10 कोटी रुपये खंडणीसाठी 4 एप्रिलपासून सतत निनावी पत्राद्वारे कुटुंबाला जिवंत मारण्याची धमकी देत आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे प्रतिनिधित्त्व करणारे गणपतराव देशमुख हे 1948 पासून महाराष्ट्र विधिमंडळाचे सदस्य आहेत. आजवर 12 वेळा निवडणुकीत विजयी झालेले देशमुख हे आज 90 वर्षांचे असून प्रत्येक निवडणूक या जनतेच्या लोकवर्गणीतून विजयी होणाऱ्या गणपतरावांना थेट 10 कोटी रुपयाची खंडणी मागण्याचे कृत्य हास्यास्पद असल्यानेच देशमुख यांनी स्वतः हा प्रकार गांभीर्याने घेतला नव्हता.
धमकी देणारा माथेफिरु मराठी आणि हिंदी भाषेत पत्रं पाठवत असून पंढरपूर-यशवंतपूर या रेल्वेच्या शेवटच्या डब्यात 10 कोटी रुपये ठेवण्याबाबत मागणी करत आहे. याबाबत पोलिसांनी त्या ठिकाणी बॅग ठेवून त्याचा माग घेण्याचा प्रयत्न करुनही तो न आल्याने पोलिसांना हात चोळत बसावे लागले होते. यानंतर एबीपी माझाने हे धमकी प्रकरण बाहेर काढल्यावर काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
"मी आजवर कोणाला आणि कधीच दुखावले नसून मला याबाबत काहीच बोलायचे नाही. मी मरणाला घाबरत नाही." अशी प्रतिक्रिया देत देशमुख यांनी कॅमेरा समोर येण्यास नकार दिला.
माथेफिरुने धनगर समाजाच्या आरेवाडी येथील मेळावा आणि इतर ठिकाणी देखील देशमुख यांचा माग काढल्याचे धमकीपत्रात उल्लेख केलंय. त्यामुळे या सर्व प्रकारचे गांभीर्य आणखी वाढले आहे. आता गणपतराव देशमुख यांच्या सुरक्षेकडे मुख्यमंत्री कशाप्रकारे लक्ष देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.