Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. राष्ट्रीय महिला आयोगाच्या ऑफीसला फोन करुन रूपाली चाकणकर यांना पुढील 24 तासात जीवे मारू असा अज्ञाताने इशारा दिलाय. धमकीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. मागील काही दिवसांत तिसऱ्यांदा धमकीचा फोन आला आहे. 


राष्ट्रीय महिला आयोगाकडून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांना अज्ञाताकडून राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात धमकीचा फोन आल्याची माहिती देण्यात आली. याआधीही रुपाली चाकणकर यांना धमकीचे फोन आलेले आहेत. 


रुपाली चाकणकर यांचा परिचय -
अवघ्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील हुकमी एक्का म्हणून या चेहऱ्याकडे पाहिलं जात आहे. तो चेहरा म्हणजे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर. रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारोंच्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायला मिळतं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. 


दौंडमधील शेतकरी कुटुंबात चाकणकर यांचा जन्म झाला. रतत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात त्यांनी शिक्षण घेतलं. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे रुपाली चाकणकर यांचाही राजकारणात प्रवेश झाला. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे. रुपाली चाकणकर यांची ओळख महिला प्रश्नावर लढणाऱ्या आणि पक्षाची बाजू खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तमरित्या पेलली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे.  आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची ही मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.