Nagpur: तापमानांची उंची गाठणाऱ्या नागपूरात नागरिकांसह चोरांनाही उन्हाचे चटके बसत असून चोरट्यांनी एकाच रात्रीत चक्क 100 किलो आईस्क्रीम चोरुन नेले. देवनगर - खामला मार्गावरील एक नव्हे तर दोन आईस्क्रीम पार्लरमध्ये एकाच रात्री केली चोरी.
चोरट्यांनी आइस्क्रीम चोरुन नेल्यामुळे आजवर चोरी गेलेलं सोनं, चांदी, इतर मौल्यवान वस्तू शोधण्याची जबाबदारी असलेले पोलिसही आश्चर्यचकित झाले आहे. आता या आईस्क्रीमची विक्री केली की स्टोअर करुन ठेवले आहे याचा तपास पोलिस करीत आहेत. दोन्ही दुकानात आईस्क्रीमच्या अनेक फॅमिली पॅक कंटेनरसह हजारोंची रोख रक्कम आणि दुकानातील देवा समोरीलही रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे.
दादा नामदेव शिंदे (55) यांचे संताजी कॉलोनी खामला रोड येथे दुकान आहे. 6 जून रोजी रात्री नेहमीप्रमाणे त्यांनी दुकान बंद केले आणि घराकडे निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी पावणेसहा वाजता ते दुकानात पोहोचले असता दुकानाचे शटर बंद होते. मात्र बाजूचे कुलुप तुटले होते. आत गेल्यावर गल्ल्यातील 5 हजार रुपये व देवळाजवळील काही पैसे गायब होते. त्यांनी अधिक पाहणी केली असता त्यांना धक्काच बसला. चोरट्यांनी पैशांसोबतच चक्क 15 हजार रुपय किंमतीचे आईस्क्रीमही फ्रिझरमधून चोरुन नेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसऱ्या घटनेत सावरकरनगर येथील रमेश खवले यांच्या डेअरीचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे दोन हजार रुपयांचे आईस्क्रीम चोरुन नेले. यासंबंधात शिंदे यांनी धंतोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास करीत आहे.
फ्रिझर मधुन चोरलेल्या आईस्क्रीमचे काय?
डिप फ्रिझरमधून या आईस्क्रीमची चोरी केल्यावर चोरट्यांनी याचे काय केले असावे असा प्रश्न पडला असून काही तासातच हे वितळून जाते. त्यामुळे याची काय व्यवस्था चोरांनी केली आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता परिसरातील नागरिकांमध्येही आहे.
पूर्ण चोरी सीसीटीव्हीत कैद
आईस्क्रीमच्या पार्लरमध्ये सीसीटीव्ही असल्याने चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या आईस्क्रीमची चटक तर चोरांना लागली नाही ना असा प्रश्न उपस्थित होत आहे.