अकोला : अकोल्यातील एका चोरीची चर्चा सध्या चांगलीच रंगली आहे, एका चोरट्याने चक्क अकोला आगारातून बस चोरल्याची घटना घडली आहे. ही घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. मात्र चोरी झालेली बस आज सकाळी मंगरूळपीर-वाशीम मार्गावर अपघातग्रस्त स्थितीत आढळली. अकोल्याच्या मध्यवर्ती बसस्थानकात रात्रीला मुक्कामी आलेल्या बसेस आगाराच्या आवारात लावण्यात आल्या होत्या. याच ठिकाणी एमएच 14 बीटी 0642 क्रमांकाची बस लावण्यात आली. बस लावून चालक, वाहक अन सुरक्षा कर्मचारी निघून गेले. मात्र, थोड्याच वेळात एका अज्ञात चोरट्याने बस पळवून नेली. ही बस चोरी गेल्याचं सकाळी समजल्यानंतर अकोला आगारात एकच हलकल्लोळ माजला. सिव्हील लाईन्स पोलीस स्थानाकात बस चोरी गेल्याची तक्रर केल्यानंतर काही तासात अकोल्यापासून अंदाजे 60 ते 70 किलोमीटर अंतरावरील मंगरूळपीर- वाशीम मार्गावर चोरीला गेलेली बस सापडली. रस्त्याच्या कडेला उलटलेल्या अवस्थेत ही बस होती. पोलीसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले अहे. मात्र बस चोर आहे तरी कोण?, असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर आगारातील कोट्यावधींच्या बसच्या सुरक्षा यंत्रणेचे धिंडवडेही या घटनेमुळे निघाले आहेत.