मुंबई : 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांसाठी लसीकरण आयोजित करण्यात आले आहे. मात्र केंद्र सरकार पुरवित असलेल्या लसींचा वापर राज्यातील रुग्णालयांनी केवळ आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी आणि 45 वर्षावरील व्यक्तींसाठीच करावयाचा असल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे कळविण्यात आले आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस, राज्य सरकाने खरेदी केलेलं लसीच्या कोट्यातूनच द्यावी असे सूचित करण्यात आले आहे. 


सध्या देशात कोरोनाच्या विरोधातील लस देण्याची राष्ट्रीय लसीकरण मोहीम सुरु आहे. राज्यातील काही केंद्रांवर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण थांबविण्यात आले आहे. ज्या पद्धतीने लसीचे डोस उपलब्ध होत आहे त्याप्रमाणे लस देण्याचे काम पुन्हा सुरु करण्यात येत आहे. सध्या देशात केवळ केवळ आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी आणि 45 वर्षावरील व्यक्तींनाच लस देण्याचे काम सुरु आहे. लवकरच महाराष्ट्र दिनापासून 18 वर्षावरील व्यक्तींना लस देण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. मात्र यांना लस देण्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकाने राज्य सरकार यांच्यावर टाकली आहे. त्यांनी लस उत्पादकांकडून थेट लस विकत घेऊन त्यांना ही लस देणे अपेक्षित आहे. 


सध्या लसीचे उत्पादन करत असलेल्या लस कंपन्यांना त्यांच्या उत्पादनाच्या 50 टक्के उत्पादन हे केंद्र सरकाच्या मोहिमेकरिता राखीव ठेवावे लागणार आहे. त्याशिवाय उर्वरित 50 टक्के लस ते  मागणी करणाऱ्या राज्यांना त्यांनी ठरविलेल्या किंमतीत ते  देऊ शकतात. 1 मे पासून 18 वर्षावरील व्यक्तीची लसीकरण मोहीम चालू झाली असली तरी केंद्र सरकारची आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन कर्मचारी आणि 45 वर्षावरील व्यक्तींसाठीची मोहीम चालूच राहणार आहे.