Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीत महायुतीला एकहाती सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? याची चर्चा रंगली होती. मात्र, भाजपला मिळालेल्या जागांचा आकडा पाहता देवेंद्र फडणवीस हेच राज्याची पुढील मुख्यमंत्री असतील हे अधोरेखित झालं होतं. त्यामुळे आज (5 डिसेंबर) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी पार पडल्याने त्याची औपचारिकता पार पडली. त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आहेत, उपमुख्यमंत्रीपदी पहिल्यांदाच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी विक्रमी सहाव्यांदा शपथ घेतली. आज फक्त तिघांचा शपथविधी मुंबईतील आझाद मैदानामध्ये थाटामाटात पार पडला. मात्र, सर्वांच्या नजरा फक्त काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर होत्या. मात्र, शपथविधी सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या देहबोलीवरून बरंच काही जाणवत होते. त्यांच्या देहबोलीमध्ये नेहमीचा उत्साह अजिबात दिसून आला नाही. कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत ते कोणत्या तरी खोल विचारात असल्याचे सातत्याने दिसून आलं. 


एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली 


एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा संधी मिळत नसल्याने प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पद सुद्धा स्वीकारणार नाही, अशी भूमिका घेतली होती. मात्र, पक्षातील आमदारांनी त्यांना आग्रह केल्याने तसेच तुम्ही जर उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार नसाल तर आम्ही सुद्धा शपथ घेणार नाही अशी भूमिका घेतल्याने अखेर ते उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी झाले आहेत. शिवसेना नेत्यांकडूनही याबाबत जाहीरपणे सांगण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही  त्यांच्यासाठी मनधरणी करण्यात आली. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची अखेर शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर अजित पवार यांनी शपथ घेतली. याचा अर्थ स्पष्ट आहे की ते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर वरिष्ठ नेते असतील.


दिल्लीतही शिंदेंचा चेहरा पडला


दरम्यान, दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यांच्या देहबोलीची सर्वाधिक चर्चा सुरु झाली. विशेष म्हणजे तेव्हापासून शिंदे यांच्या आजारी असण्यामुळे आणि भेटीगाठी रद्द करण्यामुळे प्रचंड राजकीय चर्चा झाली. त्यामुळे अखेरच्या क्षणी एकनाथ शिंदे शपथविधीसाठी राजी झाले, पण चेहराच पुन्हा एकदा बरंच काही सांगून गेला. 


मंत्रीपदाच्या वाटपावरून सुरु असलेला काथ्याकूट अजूनही सुरूच राहणार


महायुतीमधील मंत्रीपदाच्या वाटपावरून सुरु असलेला काथ्याकूट अजूनही सुरूच राहणार असल्याची  चिन्हे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळत नसल्याने भाजपकडे कोणत्याही परिस्थितीत मोठ्या खात्यांसाठी आग्रह सुरू केला आहे. मात्र, अजूनही त्यांना भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. दुसरीकडे अजित पवार गटाकडून भाजपला मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देण्यात आल्याने एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली. त्यामुळे त्यांची बार्गेनिंग पाॅवर कमी पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपद जात असेल तर गृहमंत्रालयासारखं संवेदनशील खातं आपल्याकडे मिळावं, त्याचबरोबर नगर विकास आणि महसूल खात्यासाठी सुद्धा शिवसेनेकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या सर्वच खात्यांना भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे ही खाती मिळतात की नाही याचे उत्तर आता पुढील काही दिवसांमध्ये मिळणार आहे.


खातेवाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रचंड रस्सीखेच 


दुसरीकडे, सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशीच स्थिती एकनाथ शिंदे यांची महायुती सरकारमध्ये झाली आहे का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर अर्थमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. खात्यामधील त्यांचा अनुभव ते अर्थ खातं सोडणार नाहीत असं सुद्धा बोलले जात आहे. त्यामुळे अपेक्षित असलेली खाती वाट्याला नाही आली आणि अर्थ खात सुद्धा अजित पवार यांच्याकडे राहणार असेल तर एकनाथ शिंदे यांच्यासमोर चॅलेंज असेल यामध्ये शंका नाही. महाविकास आघाडी सरकारमध्येही अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते. त्यावेळी शिदेंकडून अजित पवार यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. मात्र, भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर अनपेक्षितपणे शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. त्यामुळे अजित पवार यांच्याशी वाद होण्याचा फार संबंध आला नाही. शिंदे यांनी लाडकी बहिण सारख्या लोकप्रिय योजनांना बक्कळ पैसा देत लोकप्रियता देखील मिळवली.  त्यामुळे महायुतीला सत्ता मिळाल्यास आपल्याला पुन्हा संधी मिळेल, अशी त्यांची धारणा होती. मात्र, भाजपच्या यशाने शिंदे झाकोळले गेले आहेत.  


दुसरीकडे, खाते वाटपामध्ये शिंदेंना जितकी खाती दिली जातील, तितकीच खाती राष्ट्रवादीला मिळायला हवीत, अशी भूमिका अजित पवार गटाने घेतली आहे. दरम्यान, मंत्रीपदावरून खेचाखेच सुरु असतानाच शिवसेनेतील काही नावांना सुद्धा भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. त्यामुळे सुद्धा शिंदे नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता शिंदे यांनी प्रचंड नाट्यमय घडामोडीनंतर मंत्रीमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असला, तरी खाती कोणकोणती घेतात याकडे आता लक्ष असेल. 


इतर महत्वाच्या बातम्या