मुंबई : महापूरामुळे कोकणाचे पुरते नुकसान झाले असून, नुकसानग्रस्तांना नेमकी कशा पद्धतीने मदत केली जाणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आता ठाकरे सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अॅक्शन प्लॅन तयार केला असून, येत्या कॅबिनेटमध्ये आर्थिक अहवाल समोर ठेवला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुरस्थितीमुळे किती आर्थिक नुकसान झाले याचा आढावा घ्या असे आदेशच प्रशासनाला दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज सातारा दौरा रद्द झाला त्यानंतर त्यांनी थेट मुंबईत येऊन बैठक बोलवली होती या बैठकीत पूरग्रस्तांना काय मदत करता येईल? आर्थिक पॅकेज कसं देता येईल यावर चर्चा झाली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली.
अशी करणार नुकसानग्रस्तांना मदत
या आठवड्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकी अगोदर नुकसानग्रस्त भागांचा आढावा घेण्यात येणार असून कॅबिनेटमध्ये कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक अहवाल समोर ठेवला जाईल. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, अर्थखात्याचे सचिव व अधिकारी यांच्यात बैठक होणार असून, त्यानंतर मदतीचे निकष ठरवले जाणार आहेत. दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नुकसानग्रस्त घरांसह व्यापाऱ्यांना देखील मदत करण्याचा सरकारचा विचार आहे.
प्रशासनाला मुख्यमंत्र्यांचे 'हे' आदेश
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत प्रशासनाला पंचनामे तातडीने करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत रस्ते, वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचसोबत आरोग्य विभागाने जंतूनाशक फवारणी, लोकांना लसीकरण, गोळ्या औषधे पुरवावी असे आदेश देखील यावेळी प्रशासनाला देण्यात आले आहेत.
तौक्ते-निसर्ग सारखी मदत मिळणार काय?
मार्च 2020 मध्ये आलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर नुकसानग्रस्तांना ठाकरे सरकारकडून मदतीची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकीत NDRF च्या नियमांपेक्षा जास्त मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पूर्ण नष्ट झालेल्या घराला दीड लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली. यापूर्वी ही मदत 95 हजार इतकी दिली जात होती. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्र्यांनी रायगड जिल्ह्याचा दौरा करत तातडीने 100 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली होती. तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी 75 आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 25 कोटी रुपये मदतीची घोषणा केली होती. तशीच मदत राज्य सरकार करणार की आणखी मदतीचा हात पुढे करणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
निसर्गवेळी अशी होती मदत
- घर पूर्ण नष्ट – दीड लाख रुपये
- काही प्रमाणात पडझड झाली आहे त्यांना 6 हजाराऐवजी 15 हजार मिळणार
- घरांची पडझड झाली नाही मात्र नुकसान झालं आहे त्यांना 35 हजार मिळणार
- NDRF च्या निकषांच्या वरती जो खर्च लागेल तो राज्य सरकार देणार
- नुकसान झालेल्यांना 10 हजार रोख रक्कम देणार
- शेतीचं हेक्टरी नुकसान झालेल्या शेताला 25 हजाराहून 50 हजार रुपयांची मदत
- कम्युनिटी किचन सुरु करणार
- पुढील दोन महिने मोफत धान्य देणार